अवैध धंद्यावरून दमबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यावर खंडणीचा गुन्हा
पुणे : अवैध धंद्यांवरून पोलीस अधिकाऱ्यांना वेठीस धरून खंडणी मागणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्यावर खडक पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललित सत्यवान ससाणे असे या कार्यकर्त्याचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वी खडकी, चतुश्रृंगी आणि फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
प्रकरण असे की…
तक्रारदार प्रसाद प्रकाश शेलार (३७, रा. घोरपडे पेठ) यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे. १३ फेब्रुवारी रोजी त्यांच्या काकांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर घोरपडे पेठ येथे झालेल्या वादातून मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी अभिषेक ससाणे याने खडक पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. मात्र, या तक्रारीत प्रमोद शेलार यांचे नाव घालण्याची मागणी केली जात असल्याची माहिती तक्रारदारांना मिळाली.
तक्रारदारांनी हे नाव गुन्ह्यात न घेण्याची विनंती केल्यावर ललित ससाणेने ६ लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तक्रारदार आणि त्यांच्या काकांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी दिली.
पोलीस सुद्धा दचकायचे!
ललित ससाणे याने पोलीस अधिकाऱ्यांना धमकावून अनेकांना निलंबित केल्याचा दावा केला होता. तसेच, आपले मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे सांगत तक्रारदारावर दबाव टाकला.
तक्रारदारांच्या तक्रारीवरून खडक पोलिसांनी ललित ससाणेवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.