ओळख ज्ञानेश्वरीची या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मोठया दिमाखात साजरा
आळंदी (प्रतिनिधी) : ओळख ज्ञानेश्वरीची या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी भूमीत महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा खात्याचे मंत्री नामदार उदय सामंत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “मी फार भाग्यवान आहे, कारण माऊलींच्या ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या सेवा, तपश्चर्या व साधना भूमीमध्ये संपन्न होत आहे. त्यामुळे आजचा दिवस माझ्या आयुष्यामध्ये सोनेरी अक्षराने लिहिण्यासारखा आहे. या प्रकाशन सोहळ्यास ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष ह. भ. प. प्रकाश महाराज काळे (तात्या), उपाध्यक्ष गव्हाणे भाऊ, संत साहित्याचे गाढे अभ्यासक श्री. भावार्थ देखणे, श्री ज्ञानेश्वर महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ. सुरेश काका वडगावकर, सचिव अजित वडगावकर, भागवत संप्रदायाचे अभ्यासक अभय टिळक तसेच ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी नवभारत ज्ञानवर्धिनीचे संस्थापक समाजरत्न प्रा. एस. आर. पाटील यांनी आपल्या संस्थेच्या वतीने मा. मंत्री महोदय यांचा सत्कार केला व संस्थेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देऊन संस्थेस भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. माननीय मंत्री महोदयांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.