संतुलन पतसंस्थेचा २४ वा वर्धापन दिन सामाजिक उपक्रमांनी साजरा. नेत्र तपासणी, गुणवंतांचा सत्कार, बचत गटांचा गौरव, वार्षिक अहवालाचे प्रकाशन. ॲड. बी.एम. रेगे आणि ॲड. पल्लवी रेगे यांनी केले मार्गदर्शन. मान्यवर आणि महिलांचा मोठा सहभाग
पुणे – “आपला विकास आपल्या हाती” या ब्रीदवाक्यानुसार ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या संतुलन महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था या संस्थेचा २४ वा वर्धापन दिन आणि संचालिका ॲड. पल्लवी रेगे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि देशभरातील विविध क्षेत्रांतील दिवंगत नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यावेळी ४०० हून अधिक गरजूंना लाभ मिळालेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, बचत गटांची कामगिरी गौरव व महिलांना कौशल्य प्रमाणपत्र वितरण असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
संस्थापक ॲड. बी. एम. रेगे यांनी संस्थेच्या संघर्षपूर्ण वाटचालीचा आढावा घेत कष्टकरी व वंचितांच्या पाठीशी संस्था सदैव उभी राहील असा विश्वास व्यक्त केला. संचालिका ॲड. पल्लवी रेगे यांनी महिलांच्या नेतृत्वक्षमतेवर भर देत बचत गटांमुळे निर्माण झालेली स्वयंपूर्णता अधोरेखित केली. संस्थेच्या अध्यक्षा वंदना भुजबळ यांनी पतसंस्थेची एकूण बचत पाच कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचे सांगत संस्थेचा अर्थसंकल्प सादर केला.
यावेळी बचत गट चालक सारिका सिंग, कौशल्या पांडे, सीता जाधव यांनी अनुभव मांडले. वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या. युवा नेते सुरेंद्र पठारे आणि सहाय्यक निबंधक कार्यालयाचे सतीश मोरे यांनी वार्षिक अहवालाचे प्रकाशन केले.
कार्यक्रमास शासकीय, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह कष्टकरी महिलांचा मोठा सहभाग लाभला. २५ व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या संस्थेच्या सामाजिक कार्याची उपस्थितांनी प्रशंसा केली.