देशासाठी एक थेंब रक्त…भाजप शिरूर तालुक्याचं प्रेरणादायी पाऊल!
तळेगाव ढमढेरे | प्रतिनिधी
भारत-पाकिस्तान सीमेवरील तणावाचे सावट गडद होत असताना, आपल्या शूर सैनिकांसाठी देशभरातून सहकार्याचे हात पुढे येत आहेत. शिरूर तालुक्यातील भाजपने या संवेदनशील क्षणी जबाबदारीची जाणीव ठेवत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.
भारतीय जनता पार्टी शिरूर तालुक्याच्यावतीने “एक थेंब रक्त, जवानांसाठी” या भावनिक आवाहनासह भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार, 11 मे रोजी करण्यात आले आहे. हे शिबिर संत सावता माळी मंगल कार्यालय, तळेगाव ढमढेरे येथे पार पडणार आहे.
“देशासाठी झुंजणाऱ्या जवानांसाठी आपण काय करू शकतो, याचं उत्तर म्हणजे रक्तदान. समाजाप्रती आपली जबाबदारी ही फक्त शब्दांत न राहता कृतीत उतरायला हवी,” असे स्पष्ट आणि ठाम मत भाजप शिरूर तालुकाध्यक्ष जयेश प्रकाश शिंदे यांनी व्यक्त केले.
या रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, देशप्रेमाची ही छोटी पण महत्त्वाची भावना कृतीत उतरवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
“एक थेंब रक्त, एक जीव वाचवू शकतो – आणि कदाचित तो जीव देशाच्या संरक्षणासाठी लढणारा एखादा जवान असेल!”