145 Views
“निव्वळ उद्योग नको; माणसं वाचवणारा निर्णय हवा!”
ही गावकऱ्यांची मागणी आता मंत्रिमंडळाच्या पातळीवर पोहोचली आहे. या भेटीमुळे लढ्याला नवी दिशा आणि शक्यतो न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
पवार यांनी शेवटी सांगितलं –”पुन्हा इथे येईन, पण निर्णय घेऊनच!”
गेल्या अनेक वर्षांपासून रांजणगाव एमआयडीसीतील MEPL (महाराष्ट्र इन्व्हायरो पॉवर लिमिटेड) या कचरा प्रक्रिया कंपनीच्या प्रदूषणामुळे निमगाव भोगी गावासह परिसरातील अनेक गावांवर गंभीर परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, व शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गावाला प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांच्या व्यथा ऐकल्या आणि योग्य तो निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं.
गावकऱ्यांचा आक्रोश: "आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं!" ग्रामस्थांनी थेट व्यासपीठावर आपली व्यथा मांडताना सांगितलं की –
प्रदूषित पाण्यामुळे जनावरांचे मृत्यू,शेतजमिनीत उत्पन्न नाही,पाण्याचा व हवेचा दुर्गंध,अनेकांना कॅन्सर, किडनी व इतर आजार,मुलांच्या आरोग्यावर परिणाम,वसाहतीत काही घरं कायमची रिकामी झाली आहेत.गाव सोडून जायचं म्हणावं तर जमिनींची विक्री होत नाही, कारण जमिनी प्रदूषणामुळे निकामी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी एकच मागणी ठेवली "आम्हाला इथून बाहेर पडण्याचा मार्ग द्या, अन्यथा ही मरणयात्रा ठरेल." शरद पवार: "उद्योग हवा, पण माणसांच्या जीवावर नाही!" शरद पवार यांनी भावनिक आणि ठाम भाषेत संवाद साधला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की,
"शिरूर तालुक्याला आमच्या प्रयत्नांनी धरणाचं पाणी, उद्योग, साखर कारखाने, बागायती शेती मिळाली. पण एका कंपनीच्या निष्काळजीपणामुळे सगळं उद्ध्वस्त झालं, हे दुर्दैवी आहे." "तुम्हाला मतं मागायला आलो नव्हतो, पण तुम्ही शिक्का मारलात. आता माझं काम मागणं नाही, दायित्व स्वीकारून काहीतरी देणं आहे!"
पवार यांनी प्रस्तावित केलेल्या उपाययोजना –
1. एमआयडीसीने MEPL ला देण्यासाठी ठेवलेली अतिरिक्त जमीन थांबवावी. 2. शेती, जनावरं, व माणसांना झालेल्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी. 3. जमिनी शेतीयोग्य नसल्यास, त्यावर वार्षिक मोबदला द्यावा.
पवार यांनी स्पष्ट केलं की, हे निर्णय इथे घेता येणार नाहीत. परंतु त्यांनी उद्योग मंत्री, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीत हे मुद्दे उपस्थित करून निर्णय घेऊ, असं ठामपणे सांगितलं.
उद्योगमंत्री उदय सामंत यांची हमी
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा मांडू. तिथं निर्णय घेण्यासाठी आपण प्रयत्न करू."त्यांनी कंपनीच्या कारभाराची चौकशी होईल, हेही स्पष्ट केलं.
खासदार अमोल कोल्हे – "मी संसदेत आवाज उठवला"
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी गावकऱ्यांशी बोलताना सांगितलं की, "मी लोकसभेत हा मुद्दा मांडला आहे. केंद्र सरकारच्या लक्षात आणून दिलं आहे की, एका कंपनीच्या नावाखाली गाव उद्ध्वस्त होत आहे. आता तुमच्या सोबतच हे लढा जिंकायचा आहे."
सरपंच ज्योती सांबारे यांनी केलेल्या हृदयस्पर्शी मांडणीने सभा भावूक
गावाच्या सरपंच ज्योती लक्ष्मण सांबारे यांनी मागील १५ वर्षांतील प्रदूषणामुळे झालेल्या त्रासाचा पाढा वाचून सुनावला. त्यांनी एक-एक उदाहरण देऊन सांगितलं की, कसा गाव प्रदूषणग्रस्त बनला, जनावरं मेली, माणसं आजारी पडली आणि मुलेही प्रभावित झाली.
"MEPL ला परवानगी विज निर्मिती प्रकल्पासाठी होती, पण कंपनीने प्रकल्प सुरूच केला नाही. मग परवानगी रद्द का होत नाही?"
यावेळी माजी आमदार अशोक पवार,सूर्यकांत पलांडे,विकास लवांडे शेखर पाचुंदकर सरपंच ज्योती सांबारे आदींसह मान्यवर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.