वाघोली-केसनंद रस्ता अंधारमुक्त; ४२ स्ट्रीट लाईट्समुळे महिलांसह नागरिकांचा दिलासा!
संदीप सातव यांच्या पुढाकारातून PMCकडून ६० लाखांचा निधी मंजूर; सुरक्षिततेकडे सकारात्मक वाटचाल.
वाघोली ते केसनंद रस्त्याची अवस्था काही महिन्यांपूर्वीपर्यंत अत्यंत वाईट होती. रात्र झाली की संपूर्ण रस्त्यावर अंधार दाटायचा. या रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी धोकादायक ठरत होते. महिलांची सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिकांचा त्रास आणि पादचाऱ्यांची धडपड यामुळे हा रस्ता नागरिकांच्या नाराजीचा विषय ठरला होता. मात्र, आता या रस्त्याने अंधारातून प्रकाशाकडे एक सकारात्मक वाटचाल केली आहे.
या समस्येकडे लक्ष वेधत पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व ३४ गाव विकास समितीचे सदस्य तथा स्वीकृत नगरसेवक संदीप सातव यांनी पुढाकार घेतला. “रोज प्रवास करताना मला स्वतःला या अंधाराचा त्रास होत होता. नागरिकांचीही तक्रार होती. मी तात्काळ महानगरपालिकेशी संपर्क साधला आणि निधीसाठी पाठपुरावा सुरू केला,” असे संदीप सातव यांनी सांगितले.
या मागणीची दखल घेत पुणे महानगरपालिकेने २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात वाघोली-केसनंद रस्त्याच्या प्रकाशयोजनेसाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून ४२ नवीन स्ट्रीट लाईट खांब बसवण्यात आले असून, संपूर्ण रस्ता आता प्रकाशमय झाला आहे.
या कामामुळे आता महिलांना रात्रच्या वेळी प्रवास करताना अधिक सुरक्षित वाटते. ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांसाठीही ही सुविधा अत्यंत उपयोगी ठरत आहे.
“ही केवळ सुरुवात आहे. नागरी भागात अशीच सकारात्मक आणि लोकहिताची पावलं पुढेही उचलत राहू,” असे संदीप सातव यांनी सांगितले.