435 Views
सीसीटीव्ही अॅक्सेस अजूनही माजी अधिकाऱ्यांकडे? वाघोली महावितरण कार्यालयातील सीसीटीव्ही अॅक्सेस एका माजी अधिकाऱ्याकडे असल्याची प्राथमिक माहिती समोर.नागरिकांमध्ये चर्चा रंगली – “जुनी साखळी अजूनही सक्रिय?”
➡️ वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशीची मागणी!
वाघोली महावितरण कार्यालयाशी संबंधित वाद आणि चर्चेला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. कार्यालयाशी संबंधित वादग्रस्त प्रकरणांवर जणू काही ‘ब्रेक’ लागतच नाही. आता मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा थेट अॅक्सेस काल पर्यंत एका माजी अधिकाऱ्याकडे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही माहिती काही अंतर्गत सूत्रांकडून पुढे आल्याचं समजतय.
या संदर्भात नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले असून, काहींच्या मते सध्याच्या शाखा व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही जुनी साखळी अजूनही सक्रिय असल्याची शक्यता आहे.
महावितरणमधून बदली झाल्यावरही वाघोली कार्यालयाकडे लक्ष ठेवण्यात काही माजी अधिकारी रस घेत असल्याची कुजबुज सुरू आहे. यामध्ये नेमके कोण कोण सामील आहे, याबाबत ठोस पुरावे उपलब्ध नसले तरी, काही कर्मचाऱ्यांकडूनही या माहितीला दुजोरा मिळत असल्याचं बोललं जात आहे.
संबंधित अधिकारी महावितरणमधून बदली झालेले असतानाही, वाघोली कार्यालयावर अदृश्य नियंत्रण टिकवून ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. काहीजण तर यामागे “जुनी साखळी” अजूनही सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करत आहेत.कार्यालयात घडलेल्या पूर्वीच्या अनियमित व्यवहारांशी याचा काही संबंध आहे का? हा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. सीसीटीव्ही फूटेजचा वापर कोणत्या हेतूने केला जात आहे आणि सध्याचे पदाधिकारी यावर काय भूमिका घेतात, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर, वाघोली महावितरण शाखेच्या सुरक्षाव्यवस्थेचा पुनर्विचार होऊन वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी सध्या परिसरातील जागरूक नागरिकांकडून होत आहे.
या सर्व प्रकाराबाबत मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सकारात्मकता दर्शवत, माहिती घेऊन लवकरच सर्व प्रकारांची योग्य ती चौकशी करणार असल्याचे सांगितले
क्रमशः.
पुढील भागात २०१९-२३ दरम्यान झालेला अनियमित व्यवहार