शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोरेगाव भीमा पोलीस चौकीचा कारभार सध्या नागरिकांच्या टीकेचा विषय ठरला आहे. चौकीमधील पोलीस कर्मचारी अनेकदा अनुपस्थित असतात, तर उपस्थित असतानाही परिसरात सुरु असलेले अवैध धंदे, वाहतुकीचा बेजबाबदार कारभार आणि नागरिकांच्या सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
चौकीच्या अगदी पाठीमागे काही ठिकाणी अवैध व्यवसाय बिनधास्तपणे सुरू असून, स्थानिक पोलीस याकडे कानाडोळा करत आहेत. विशेष म्हणजे, अशा परिस्थितीत बाहेरील उरुळी कांचन पोलीस हद्द ओलांडून येऊन कारवाई करत आहेत. या निष्क्रियतेमुळे स्थानिक पोलीस चौकीबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
तसेच, पोलीस चौकीसमोरच अवैध प्रवासी वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. अनेक वाहने विरुद्ध दिशेने चालवली जात असल्यामुळे मुख्य रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. मात्र, कोंडीचे प्रमाण वाढूनही पोलीस कर्मचारी रस्त्यावर दिसत नाहीत. चौकीपासून अवघ्या काही मीटर अंतरावर हे सर्व घडत असूनही दुर्लक्ष होत आहे, ही बाब गंभीर आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, काही पोलीस कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून स्वतःच्या सोयीनुसार कारभार चालवत आहेत. त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देत कोरेगाव भीमा पोलीस चौकीमध्ये कर्तव्यनिष्ठ, सजग आणि जबाबदार कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.या भागातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी या पोलीस चौकीमध्ये शिस्त, जबाबदारी आणि नियमित देखरेख अत्यावश्यक आहे, असे नागरिकांचे मत आहे.