ट्रिनिटी महाविद्यालयामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी
सार्वभौम न्युज समूह
कल्याणराव जाधव शैक्षणिक संकुलातील ट्रिनिटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 108 वी जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रा. धनाजी व्यवहारे आणि प्रा.विनायक हिरे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना प्रेरक माहिती सांगितली. प्रा. घोडके यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनातील एका धनाढ्य व्यापाराबरोबर घडलेला किस्सा सांगताना ते म्हणाले की, रयत शिक्षण संस्था उभारताना अनेक लोकांकडे कर्मवीर भाऊराव पाटील मदतीसाठी जात असत. एकदा असेच एका धनाढ्य व्यापाराकडे ते गेले असताना त्या व्यापाऱ्याने कर्मवीरांनी त्यांच्या उभारलेल्या एक विद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे दिलेले नाव बदलून आपले नाव देण्यासाठी अट घातली. त्यावर कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या व्यापाऱ्याला आपण एक वेळ आपल्या वडिलांचे नाव बदलू परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे दिलेले नाव बदलू देणार नाही असे परखडपणे सांगितले आणि त्यांची मदत देखील नाकारल्याचा किस्सा सांगितला.


छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणाऱ्या आणि छत्रपतींनी प्रजेला उद्देशून वापरलेला
‘ रयत ‘ या शब्दाचाच त्यांनी पुढे आधार घेत त्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेसाठी उपयोग केला आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना महाराष्ट्रामध्ये केल्याचं सांगितलं.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर लावरे यांनी कर्मवीरांच्या कार्याचा आढावा घेताना कर्मवीरांनी महाराष्ट्राला ‘कमवा आणि शिका’ ही योजना दिली तसेच स्वावलंबनातून शिक्षण हे ब्रीद त्यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी बिंबवले आणि तळागाळातील लोकांच्या दारामध्ये शिक्षणाची गंगा पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केल्याचे नमूद केले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्वच शिक्षक आणि शिक्षकेतर सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.






