महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कोलंबो येथे रंगणार आहे.
पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये हस्तांदोलन झाले नाही.
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील ६ वा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान या महिला संघांमध्ये पाहायला मिळणार आहे. रविवारी (५ ऑक्टोबर) कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना रंगाणार असून दोन्ही संघांचा या स्पर्धेतील हा दुसरा सामना आहे.


याशिवाय दोन्ही संघांच्या चाहत्यांना सलग चौथ्या रविवारी सामना दोन देशातील क्रिकेट सामना पाहायला मिळत आहे. गेल्या सलग तीन रविवारी आशिया कप २०२५ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचे पुरुष संघ आमने-सामने होते. आता या रविवारी भारत आणि पाकिस्तान महिला संघ आमने-सामने आहेत.
या सामन्यात पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना खान हिने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात प्रत्येकी १ बदल झाला आहे.
भारताची अष्टपैलू खेळाडू अमनजोत कौर आजारी असल्याने ती या सामन्यातून बाहेर झाली आहे. तिच्या जागेवर रेणुका सिंग ठाकूरला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. पाकिस्तानने सदाफ शमाला ओमैमा सौहैलच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.
दरम्यान, आशिया कप २०२५ मध्ये भारत – पाकिस्तान सामन्यावेळी ज्याप्रमाणे नाणेफेकीवेळी कोणतेही हस्तांदोलन झाले नाही, त्याप्रमाणेच महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेतील ६ व्या सामन्यावेळीही भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना खान यांच्यातही हस्तांदोलन झाले नाही.
एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही संघातील संबंध बिघडले आहेत. त्याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर झाला असून क्रिकेटवरही त्याचा परीणाम दिसत आहे. यापूर्वी आशिया कपमध्येही भारतीय संघाने पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवणं टाळलं होतं. आता महिला वर्ल्ड कपमध्येही तेच चित्र दिसत आहे.
प्लेइंग इलेव्हन –
भारत – प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), स्नेह राणा, रेणुका सिंग ठाकूर, क्रांती गौड, श्री चरणी
पाकिस्तान- मुनीबा अली, सदफ शमास, सिद्रा अमीन, रमीन शमीम, आलिया रियाझ, सिद्रा नवाज (यष्टीरक्षक), फातिमा सना (कर्णधार), नतालिया परवेझ, डायना बेग, नशरा संधू, सादिया इक्बाल






