ट्रिनिटी महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
कल्याणराव जाधव शैक्षणिक संकुलातील ट्रिनिटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने महात्मा गांधी यांची 156 वी जयंती नुकतीच महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विनायक हिरे यांनी केले. ” सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा वापर करून महात्मा गांधींनी भारतीय जनमाणसांवर मोठा प्रभाव पडला तसेच स्वातंत्र्याची पहाट होत असताना महात्मा गांधी खेड्यातील लोकांची सेवा करत होते असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमांमध्ये उपप्राचार्य, प्रा. घोडके यांनी गांधीजींच्या ‘माझे सत्याचे प्रयोग’ या पुस्तकातील गांधीजींच्या विद्यार्थी दशेतील काही प्रसंगांचा दाखला दिला. विद्यार्थी दशेमध्ये गांधीजींना ‘जंटलमन’ बनण्याचे स्वप्न खुणावत होते परंतु ह्या स्वप्नाचा पाठलाग करताना आणि त्यासाठी आवश्यक असणारी सर्व कौशल्य आत्मसात करताना आपला शिक्षणाचा मूळ उद्देशच दुरावतो आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ‘जंटलमन’ बनण्यासाठीचे सुरू केलेले सर्व प्रयत्न बंद करून टाकले, पुढे आपल्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित केलं आणि पुढे काळाच्या ओघात ते खऱ्या अर्थाने ते ” बनल्याचं त्यांनी सांगितलं.
मार्टिन ल्युथर किंग दुसरे , नेल्सन मंडेला, आण सांग स्यु की या जागतिक स्तरावरील प्रभावशाली लोकांनी देखील गांधीजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, आपापल्या देशामध्ये सत्य, अहिंसा, सत्याग्रह, उपोषणाच्या माध्यमातून क्रांती केल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शंकर लावरे हे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांनी महात्मा गांधीजींच्या जीवनातील शिस्तीचे महत्व विशद केले. सत्याचा आग्रह धरणाऱ्या महात्मा गांधींमध्ये लोकांना आपलंसं करण्याची कला होती. महात्मा गांधीजींनी लोकांना एकत्र जोडून स्वातंत्र्यसंग्रामामध्ये जनसहभाग वाढवून अहिंसेच्या, सत्याग्रहाच्या, उपोषणाच्या, आणि पदभ्रमणाच्या माध्यमातून क्रांती घडवत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिल्याचे त्यांनी नमूद केले. गांधीजींच्या विचाराची आज खऱ्या अर्थान देशाला गरज असून तरुणांनी गांधीजींचे ‘माझे सत्याचे प्रयोग’ हे आत्मचरित्र वाचावे असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक सहकारी उपस्थित होते.








