Home » ब्लॉग » बरेच ज्येष्ठ नागरीक, श्रीमंत म्हणून मरतात, पण श्रीमंत म्हणून जगत नाहीत!

बरेच ज्येष्ठ नागरीक, श्रीमंत म्हणून मरतात, पण श्रीमंत म्हणून जगत नाहीत!

Facebook
Twitter
WhatsApp
40 Views

बरेच ज्येष्ठ नागरीक, श्रीमंत म्हणून मरतात, पण श्रीमंत म्हणून जगत नाहीत!

 

स्थावर मालमत्तेमध्ये वरीष्ठ नागरीक मनाने गुंतलेले असतात, तसे हल्लीची पिढी करीत नाही. आधुनिक पिढी ही त्या बाबतीत भावनाहीन म्हणजे प्रॅक्टिकल आहे. पूर्वीच्या पिढीने मोठमोठी घरे बांधली, ती मुलांसाठी आणि नातवंडांसाठी देखील! कमावलेला सारा पैसा  बहुतेकांनी आपल्या पुढच्या पिढीचा विचार करतच खर्च केला. ना हे वरीष्ठ कुठे लांब सहलीला गेले, ना कधी परदेशात जाऊन लाखो रुपये खर्च केले. ना आठवड्यातून एकदा पिझ्झा मागवला, ना बर्गर! नाटक सिनेमा सुद्धा वर्षातून दोन तीन वेळा! पैसे फक्त मुलांसाठी राखून ठेवायचे, झालेच तर एक दुसरा फ्लॅट घेऊन ठेवायचा, जो स्वतःसाठी काही उपयोगाचा नाही. शहरात राहात असेल तर गावी घर बांधायचे, जमीन विकत घ्यायची, असे उद्योग केले.

परीणाम झाले काय..?  तर मुलांना आधुनिक शिक्षण दिले जे फक्त आणि फक्त नोकरीभिमुख आहे.  कुठलीही शाळा, किमान भारतातील तरी, व्यवसाय वा धंदा किंवा उत्पादनाभिमुख उद्योग कसा करावा हे शिकवित नाही. डॉक्टर होण्यासाठी साधारण एक कोटी रुपये लहानपणापासून खर्च येतो.इंजिनियर होऊन दहा हजारातील एक मुलगा  उत्पादनप्रणित उद्योगांकडे वळतो. बाकीचे ९९९९ इंजिनिअर फक्त इतर शहरात किंवा परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीच्या मागे असतात. स्थिर होईपर्यंत पाच सात कंपन्या सोडलेल्या असतात. *आपल्या मुळ गावी न राहील्यामुळे, इतर ठिकाणी, दुसऱ्या शहरात वा परदेशात कायम वास्तव्य करायचे ठरवल्याने इथल्या मालमत्तेमध्ये नवीन पिढीला अजिबात रस नसतो! पुढील पिढीला हे घर, जमीनजुमला याकडे पाहायला, त्याची निगा राखायला वेळ नाही. आणि त्यांना त्यात रस नाही, निष्ठा नाही! मग आईवडीलांचे निधन झाल्यावर काही मुले ती जमीन, घर विकून पैसे घेऊन निघून जातात. परदेशात राहाणारी कित्येक मुले मुली, आईवडील जिवंत असताना येत नाहीत, वेळ नाही या सबबीवर! पण ते वर गेल्यावर मात्र इथे सारे आर्थिक हिशोब निपटायला एक दीड महिन्याची रजा मिळते!  हे मी अनुभवले आहे. बँकेत अशा काही मुलांचा, जेष्ठ नागरीकांचा अनुभव आलेला आहे. आश्चर्य म्हणजे मागील पिढीचा मोह, मुलांविषयीच्या अपेक्षा काही कमी होत नाहीत. सगळ्या स्थावर व बँकेतील पैशांना वारस म्हणून आपल्या मुलाला वा मुलीलाच ठेवतात, जे दूर राहून, परदेशी राहून, कधी आईबापाच्या आजारपणात देखील भेटायला न येणाऱ्या ह्या मुलांना, ते गेल्यावर एक छोटी मोठी लॉटरीच लागते ! हे मी अनुभवांती बोलतोय. कारण मी 20-25 वर्षे पब्लिक रिलेशनमध्ये काम केले आहे.

हे वरीष्ठ नागरीक,पूर्वीची पिढी सोन्या चांदीचे दागिनेही आपल्या मुलाबाळांसाठी करून ठेवतात. हल्लीच्या पिढीला जुन्या नक्षीकामाचे दागिने पसंत नाहीत, तर पाश्चात्य लोकांप्रमाणे नव्या डिझाईनचे / खोटे म्हणजे इमिटेशन ज्वेलरी पसंत आहे. म्हणजे त्याचाही हल्ली काही उपयोग नाही.

नवी पिढी पैसे कमावणे आणि पैसे खर्च करणे एवढेच जाणते! पण त्यांना पैसे कमावण्यायोग्य ज्या पिढीने केले, त्यांचे अनुभव, त्यांची आस्था, प्रेम, निष्ठा याच्याशी नवीन पिढीला काही कर्तव्य नाही. पूर्वीच्या पिढीने आपल्या कर्तव्यापुढे आपली मौजमजा बाजूला ठेवली. गरजे नुसारच खर्च केला. पण मुलांना अगदी कुठल्याही अडचणींशिवाय, त्रासापासून मुक्त असे वाढविले. जे आपल्याला मिळाले नाही, त्याची वानवा नव्या पिढीला पडू नये, याची काळजी घेऊन उच्च शिक्षण त्यांच्या क्षमतेनुसार दिले. पण बरेच वरीष्ठ आपल्या पुढच्या पिढीला हवे तसे चांगले संस्कार देण्यात कमी पडली, कमी पडते आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

आपले आईवडील आपल्याला परीस्थितीची जाणीव देत असत. गरीब आहोत, की मध्यामवर्गीय हे मुलांना ठाऊक असे. पैसेवाले देखील आपल्या मुलांचे पाय जमिनीवर राहावेत याची काळजी घेत. पूर्वी अगदी क्वचित कोणी बाईक वा कार ने शाळेत येत असे. अन्यथा श्रीमंत मुले फार तर सायकलवर येत. पूर्वीच्या पिढीने खाऊ वाटताना आपला परका असा मुलांमध्ये भेदभाव केला नाही. हुशार विद्यार्थ्यांना काही श्रीमंतांनी मदत केली पुढे जायला! आता मात्र चित्र बदलले आहे. नवी पिढी बऱ्यापैकी स्वार्थी झाली आहे.  ह्याला कारण पूर्वीचीच पिढी आहे.*नवी पिढी स्वतःच्या सुखाकडे म्हणजे ऐहीक सुखाकडे जास्त लक्ष देत आहे. टी व्ही, फ्रिज, कार, लॅपटॉप, नवनवे मोबाईल, बाईक, स्कुटी आणि घरातील इतर सुखसोयी त्यांना नाते वा संस्कार यापेक्षा जास्त महत्वाच्या वाटतात!

  वरीष्ठ आता आपला भार मुलांवर पडू नये असे शक्यतो पाहातात. पण हल्ली नातवंडांची जबाबदारी देखील, जर एकत्र राहात असतील तर घेतात.

ही जी जबाबदारीची आणि कर्तव्याची जाणीव मागील पिढीला होती व आहे तीच जाणीव आताच्या पिढीमध्ये कमी होत चालली आहे!

आधीच्या पिढीने आता हे ध्यानात ठेवावे की आयुष्यमान वाढते आहे, राहाणीमान महाग होते आहे, अशा वेळी तुम्ही स्वतःकडे केव्हा पाहाणार आहात..? आपली संपत्ती आपल्या मृत्यूनंतर इथेच राहाणार आहे. पुढील पिढीला ती आयती संपत्ती मिळाल्यावर त्यांना त्या संपत्तीचे मोल असणार नाही. कारण रुपयाचे अवमूल्यन कमी होत आहे. कालचे तुमचे 1000 रुपये आज 1 रुपया समान आहे. आता तरी पुढील पिढीच्या सुखासाठी आपले सुख बाजूला सारु नका. तुम्ही त्यांना कमावण्यायोग्य बनवले आहे. ते त्यांचे जीवन जगत आहेत.तुम्हीही तुमचे जीवन जगा!

जीवनाचा आनंद घ्यायला आता तरी शिका. बरेच भारतीय आपले जीवन कंजुष पणाने जगतात, काटकसरीने खर्च करतात ते केवळ पुढील पिढीने श्रीमंत व्हावे, त्यांना काही कमी पडू नये म्हणून! पण आता हे बंद करा. स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःचे छंद, इच्छा यावर खर्च करा. राहीलेल्या इच्छांची एक यादी करा. त्या यादीतील एक एक इच्छा पुरी करण्यासाठी जगा. जुन्या मित्रमैत्रिणींना भेटा!

साठ पासष्ठ म्हणजे काही मरण्याचे वय नव्हे! आता अजून किती दिवस जगणार आहोत, हा विचार सोडा! समजा, तुम्हाला जर नशिबाने नव्वद ते शंभर वर्षांचे आयुष्य दिले असेल तर अजून तुमच्याकडे वीस पंचवीस किंवा तीस वर्षे शिल्लक आहेत, जी तुम्ही पूर्णपणे स्वतःसाठी जगू शकाल! पुरे झाले आता इतरांसाठी जगणे! “आता आपले काय राहीलेय..?” हा विचार करीत राहाल तर शेवटची काही वर्षे आजारपणात, इतरांच्या वर अवलंबून काढावी लागतील, हे लक्षात ठेवा!

दिर्घायुषी व्हा, निरोगी राहा. गरीबीत भले जन्माला आला असाल, श्रीमंत म्हणून फक्त मरू नका, तर श्रीमंतीत जगा! मस्तीत राहा, लहान लहान गोष्टीत आनंद मिळवा!

 

लेख आवडला असेल तर ज्येष्ठ नागरिकांना पुढे पाठवा…

(श्रीपाद कुलकर्णी कराड)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!