एक सुखवस्तू दांपत्य मुंबईत रहात होतं.
त्यांचे नातेवाईक अगदी जवळचे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे होते. ते देखील नातेवाईकांना शक्य होईल तितकी मदत करायचे. नातेवाईक आणि दाम्पत्यात काहीच आडपडदा नव्हता. एक दिवस नवऱ्याची ट्रान्स्फर दिल्लीला होण्याची शक्यता निर्माण झाली. बायकोची नोकरी मात्र मुंबईतच होती. मग दांपत्याने नातेवाईकांची बैठक बोलावली. नवरा बायकोने वेगवेगळं रहाव का ह्यावर चर्चा झाली. आणि दोघांच्या भविष्याच्या दृष्टीने एकत्र न राहण्याचा निर्णय योग्य ह्यावर दांपत्य आणि नातेवाईक दोघांचंही एकमत झालं आणि नवऱ्याने दिल्लीची ऑफर स्वीकारली.
ही बातमी बाहेर पडताच शेजारी, समोरच्या इमारतीतले, कामवाल्या, लिफ्टमन, सफाई कामगार आणि आजूबाजूच्या गल्लीतले अनेक स्वयंघोषित हुशार लोक ज्यांचा नातेवाईक आणि दाम्पत्याशी काहीही संबंध नव्हता असे अनेकजण “घाबरू नका. नवरा अचानक दिल्लीला गेला असला तरी त्याचा डिव्होर्स झालेला नाही. सगळ आलबेल आहे. ते दोघे फक्त त्यांच्या उज्वल भविष्यासाठी वेगळे रहात आहेत. ह्यातच दोघांचा उत्कर्ष आहे. तुम्ही उगाच संशय घेऊ नका किंवा पॅनिक होऊ नका” असं त्या दांपत्याच्या नातेवाईकांसकट एकमेकांना सांगू लागले. नातेवाईकांना आधीच कारण माहीत असल्याने नातेवाईक हे ऐकून हसत होते. बाकी लोक काहीच संबंध नसल्याने त्यात काहीच इंटरेस्ट दाखवत नव्हते. पण त्या निमित्ताने स्वयंघोषित एक्स्पर्ट लोकांना आपले ज्ञान दाखवायला एक विषय मिळाला होता.
आज हे आठवायचं कारण म्हणजे टाटा मोटर्सचा शेअर अचानक ४० ते ४५% पडल्यावर तो का पडला हे समाज माध्यमांवर इस्कटून सांगणाऱ्या स्वयंघोषित शेअरबाजार बैलांच्या (बैल = बुल) रिल्सचा गेले दोन तीन दिवस सुरू असलेला उच्छाद! त्यातही काहीजण “तुम्ही टाटा मोटर्सचे शेयर होल्डर असल्यास काळजी करू नका” अश्या अगोचर सूचनाही देतात. अरे बाबांनो टाटा मोटर्स स्प्लिट करायचा निर्णय एखाद्या मुंब्र्याच्या टेकडीवर किंवा सफेद पूल वरील एखाद्या पुढे वाण्याचं दुकान आणि मागील वळचणीत हळूच सुरू असलेल्या कोंदट, अंधाऱ्या स्वस्तिक बार मधे गुप्त मीटिंग करून झालेला नाही. शेयर होल्डर्सची रीतसर परवानगी घेऊन विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे तो आणि मुख्य म्हणजे त्याबद्दल तुम्हाला माहीत व्हायच्या आधीपासून शेयर होल्डर्सना कल्पना आहे. आणि मुळात ह्या घटनेत काहीच रॉकेट सायन्स नाहीये. मग काहीतरी भयानक आर्थिक संकट समजावून सांगण्याचा आव आणून, गळा ताणून त्यावर चार पाच मिनिटांची बदाबदा रील्स का बनवता?








