सत्यकथा – श्रीकृष्ण दर्शन
जगदीश क्षत्रिय
अफलातून लॉजिक
“लोकं मला जेवढी नावं ठेवतील तितकं माझं पाप कमी होत जाईल.”


आज नेहमीप्रमाणे जिम मधून घरी परत येताना वॉटर एटीएम जवळ थांबलो होतो.
पाणी विकत घेण्याचे दु:ख नसतं ,
पण त्या मशीन मध्ये चालणारी पाच रुपयाची नाणी कधी कधी इतरांकडे भिकाऱ्यासारखी मागायला लागतात हे दुःख जास्त होतं.😃
असो.
तर माझ्यापुढे गृहस्थ मशिन मधून पाणी घेत होते. त्यांचा दहा लिटरचा कॅन भरून झाल्यानंतर ते थोडेसे बाजूला झाले, त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्यांच्या डाव्या हाताला, पायाला काहीतरी प्रॉब्लेम आहे . हालचालींवरून असं वाटत होतं की बहुतेक पॅरालिसिस अटॅक येऊन गेलेला असावा.
मी माझ्या स्वभावाप्रमाणे थांबलो, त्यांना विचारलं की तुम्हाला घरी सोडायचे आहे का ? मी गाडीवरून सोडतो.
गृहस्थांनी अतिशय नम्रपणे नकार दिला. म्हणाले, जवळच घर आहे माझं. तेवढाच व्यायाम होईल शरीराला.
त्या गृहस्थांचं एकंदरीत वागणं, बोलणं, दिसणं आणि त्यांच्या डोळ्यात ते भाव, हे मला एका प्रगल्भ माणसासारखे जाणवले .
त्यांच्यामध्ये जबरदस्त मॅच्युरिटी होती .एक मानसिक शांतता होती.
मला रहावलं नाही. मी त्यांना विचारलं , की “साहेब तुम्हाला काही छोटासा आरोग्याचा प्रॉब्लेम वगैरे झाला होता का ?”
माझ्या प्रश्नाचा रोख त्यांनी ओळखला. त्यांनी कॅन हातातून खाली ठेवला आणि मला डावा पाय दाखवला.
ते म्हणाले हे माझं लहानपणापासूनच असं आहे, माझ्या डाव्या पायाची उंची थोडी कमी आहे.
एक दीर्घ श्वास घेऊन ते पुढे म्हणाले की, ” बघा मी चालताना डान्स केल्या सारखा दिसतो की नाही ? मी नॅचरल डिस्को डान्सर आहे “
आणि ते दिलखुलासपणे हसले.
माझीच अवस्था केविलवाणी झालेली होती.
त्यांचं ते निरागस हसणं आणि निरागस डोळे ,हे माझ्या मेंदूला सहन झाले नाहीत. मला अपेक्षा होती की ते दुःख विव्हळतील .
स्वतःच्या समस्या सांगत बसतील .पण तसं काहीच झालं नाही.
मी अशी भरपूर माणसे बघितली आहेत की जी स्वतःच्या स्थितीसाठी देवावर चिडून असतात .समाजावर चिडून असतात .कायम रागात असतात . सतत पीडित असल्याचा राग आळवणे त्यांना फार आवडत असते.
मला सकाळी सकाळी एक गुरु भेटला होता. मी त्याच्याशी संवाद साधायचा ठरवला.
मी सरळ सरळ शरण गेलो विचारलं की ” देवा तुम्ही एवढे संतुलित कसे आहात ?”.
ते म्हणाले “कदाचित मागच्या जन्मात मी काहीतरी पापं केली असतील, त्यामुळे देवाने मला या जन्मात मी अशी शिक्षा द्यायचे ठरवलं असेल. त्याची मर्जी .
त्याच्यापुढे मी काय करू शकतो ?”.
मी पुन्हा विचारले ” महाराज देवापुढे सगळेच जण शरण जातात .
पण समाजाबद्दल सुद्धा तुमच्या मनात काहीही कटूता नाही. हे कसं ?”.
ते म्हणाले की “लहानपणी मला खूप राग यायचा. शाळेतली मुलं ,मुली चिडवायचे. मोठी माणसे चिडवायची.
पण नंतर हळूहळू असं लक्षात यायला लागलं की, लोकं मला जेवढी नाव ठेवतात, तेवढा माझा फायदाच होतो.”
“कसं काय?”
“त्याचं नेमकं असं गणित आहे की, मी झेललेला प्रत्येक कुत्सित टोमणा ,प्रत्येक चिडवणं, प्रत्येक अपमान, हा माझं मागच्या जन्मीचं पाप हळूहळू फेडून घेण्याची व्यवस्था आहे.
आणि जे कोणी माझी चेष्टा करतात ,ते पाप त्यांच्या नावावर जमा होण्याची व्यवस्था आहे.”
माझ्या पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत सगळीकडे शहारे आले.
क्षणभर मी त्या गृहस्थाला विसरलो आणि मी लहानपणापासून आतापर्यंत अशी किती पापं माझ्या नावावर जमा केली असतील. याचा हिशोब मला लागेना.
मी माझ्या हातातला कॅन खाली ठेवला .ते गृहस्थ माझ्यापेक्षा वयाने कमी होते तरी पण मी त्यांना वाकून नमस्कार केला.
भगवद्गीता नुसती ऐकून, वाचून लोकं शहाणी होत नाहीत. तसं असतं तर आत्तापर्यंत सगळा समाज शहाणा झाला असता.
श्रीकृष्ण असा कोणत्यातरी रूपात भेटावा लागतो. समोर दिसावा लागतो.
तो असतो ,दिसतो आणि आपल्याला सांगतो देखील. आपल्यालाच ओळखता येत नाही.
आजचा सत्य अनुभव
जगदीश क्षत्रिय.
१३ ऑक्टोबर २०२५






