‘जातीय भेदभावामुळे हजारो दलित विद्यार्थ्यांच्या आकांक्षा उद्ध्वस्त’; लंडनमधील नोकरी गमवावी लागल्याचं प्रकरण नेमकं काय?
पुणे : महाविद्यालयानं शिफारस पत्राच्या पडताळणीत सहकार्य केलं नसल्यानं नोकरीची संधी गमावावी लागल्याचा आरोप प्रेम बिऱ्हाडे नावाच्या तरुणानं केली आहे.
पुण्यात मॉडर्न आर्टस, कॉमर्स नावाच्या महाविद्यालयावर एका विद्यार्थ्यानं केलेल्या आरोपांचं प्रकरण सध्या चर्चेत आलं आहे.
या प्रकरणात जातीय भेदभाव झाल्याचा आरोप करण्यात येत असल्यानं या प्रकरणानं आता गंभीर वळण घेतलं आहे.


महाविद्यालयानं शिफारस पत्राच्या पडताळणीत सहकार्य न केल्यानं परदेशातील नोकरीची संधी गमावावी लागली, असा आरोप प्रेम बिऱ्हाडे नावाच्या तरुणानं केला आहे. दरम्यान जातीविषयी विचारणा केल्याचंही त्यानं सांगितलं.
प्रेमसोबत घडलेला प्रकार ही केवळ त्याची वैयक्तिक व्यथा नसून, अशा हजारो दलित विद्यार्थ्यांची असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
तर महाविद्यालयानं या प्रकरणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. प्रेमविषयी महाविद्यालयीन काळात वर्तणुकीच्या तक्रारी असल्याचा आरोप करत नियमांनुसार ‘रेफरन्स’ दिला नसल्याचं महाविद्यालयानं म्हटलं आहे.
सोशल मीडियावरही या प्रकरणी वादविवाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
या विरोधात काल 17 ऑक्टोबररोजी NSUI महाराष्ट्रच्या वतीने पुणे येथील मॉडर्न कॉलेजमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.
नेमके प्रकरण काय?
प्रेम बिऱ्हाडे या तरुणाचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने पुण्यातील मॉडर्न आर्टस, कॉमर्स कॉलेजवर गंभीर आरोप केले आहेत.
“मॉडर्न कॉलजने मला व्हेरिफिकेशनला मदत न केल्याने मला नोकरी गमवावी लागली”, असा आरोप प्रेम बिऱ्हाडेने केलाय.
प्रेम बिऱ्हाडे हा मुळचा नंदुरबार जिल्ह्यातील नांदरखेडा या गावचा रहिवाशी आहे. प्रेमने आपलं पदवी शिक्षण पुण्यातील मॉडर्न आर्ट्स कॉमर्स कॉलेज येथे घेतलं. 2020 ते 2024 या काळात त्याने बीबीएची पदवी घेतली.
PremBirhade/instagramप्रेम बिऱ्हाडे या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यानंतर मागील वर्षी त्याची इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स विद्यापीठात निवड झाली.
यासाठी त्याला 7 लाखांची ससेक्स इंडियन स्कॉलरशिप मिळाली. यातून त्याने ‘मास्टर्स इन मार्केटिंग अँड कन्झ्युमर सायकॉलॉजी’ या विषयात शिक्षण पूर्ण केलं.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला इंग्लंडमध्येच एका कंपनीत लॉजिस्टिक अँड सप्लाय वेअर हाऊस ऑपरेटिव्ह म्हणून नोकरी मिळाली.
नोकरी लागल्यावर निवड प्रक्रियेचा भाग म्हणून मागील 5 वर्षाची पडताळणी कंपनीकडून करण्यात आली.
“मॉडर्न कॉलेज सोबत कंपनीने पडताळणीसाठी संपर्क केल्यावर सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली आणि नंतर प्रेम बिऱ्हाडे हा आमचा विद्यार्थी नाही, अशी प्रतिक्रिया कंपनीला दिली. यामुळे मला ही नोकरी गमवावी लागली”, असा आरोप प्रेम बिऱ्हाडेने सोशल मीडियावर व्हीडिओ पोस्ट करत केला आहे.
प्रेमने व्हीडिओत काय सांगितले?
प्रेम बिऱ्हाडे म्हणाला, “माझ्या कॉलेजच्या विभागप्रमुख लॉली दास यांनी आम्हाला तुझ्या कंपनीतून मेल आला होता, पण तुम्हाला या संदर्भात कॉलेजच्या उपप्राचार्य सरदेसाई मॅडम सोबत बोलावं लागेल, असं सांगितलं होतं. मात्र, उपप्राचार्य सरदेसाई यांना खुप मेसेज आणि कॉल केल्यावर त्यांनी सांगितलं की, तू तुझ्या विभागप्रमुखांशीच बोल.”
“मी पुन्हा विभाग प्रमुखांशी बोललो, तर त्यांनी मला विचारलं की, तुझे डॉक्युमेंट्स तर व्हेरिफाय केलेले आहेत, पण तुझी जात काय आहे? यावेळी त्यांनी मला हेही सांगितलं की, सरदेसाई मॅडमच्या सांगण्यावरून आम्ही तुला शिफारस देऊ शकत नाही,” असं प्रेम बिऱ्हाडे यांनी सांगितलं.
PremBirhade/instagramमागील वर्षी त्याची इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्स विद्यापीठात निवड झाली.
प्रेम पुढे म्हणाला, “पण मला त्यांच्याकडून शिफारस नको होती. मला त्यांच्याकडून फक्त हे कन्फर्मेशन हवं होतं की, मी मॉडर्न कॉलेजचा 2020 ते 2023 या काळात विद्यार्थी होतो. लॉलिता दास मॅडमनी मला तेही देण्यास नकार दिला.”
“त्यांनी माझ्यावर आरोप केलेत की, मी नियमितपणे कॉलेजला येत नसे, मी प्रामाणिकपणे कॉलेज केलं नाही. मात्र हे सगळं असेल, तर कॉलेजने मला पास कसं केलं? मला इंग्लंडला प्रवेश मिळाल्यावर कॉलेजने दोन शिफारस पत्रं कशी दिली?”, असा प्रश्न प्रेमने आपल्या इन्स्टाग्रामवरील व्हीडिओत विचारला आहे.
मॉडर्न कॉलेजनं काय स्पष्टीकरण दिलं?
या प्रकरणावरून टीका झाल्यानंतर मॉडर्न विद्यापीठ प्रशासनाने 17 ऑक्टोबरला पत्रक काढत अनेक दावे केले आहेत.
त्यांनी म्हटलं, “आमच्या महाविद्यालयातील माजी बीबीए विद्यार्थी प्रेमवर्धन नारोत्तम बिऱ्हाडे यांनी जून 2020 मध्ये प्रवेश घेतला आणि जानेवारी 2024 मध्ये पदवी पूर्ण केली. ते सातत्याने महाविद्यालय, प्राध्यापक आणि प्राचार्य यांच्याविरोधात सोशल मीडियावर चुकीचे आरोप करत आहेत. बदनामीकारक वक्तव्य करत आहेत आणि हेतूपुरस्सर महाविद्यालयाची प्रतिमा मलीन करत आहेत.”
“त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांच्या वर्तणुकीविषयी काही तक्रारी होत्या. म्हणून संस्थेच्या नियमांनुसार असा रेफरन्स देणे योग्य नसल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या या सोशल मीडिया पोस्ट वारंवार चुकीची माहिती पसरवत आहेत,” असा आरोप मॉडर्न विद्यापीठ प्रशासनाने केला.
“विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण केला जात आहे आणि महाविद्यालय व प्राचार्यांसोबत महिला प्राध्यापकांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न होत आहे. हे सर्व प्रकार बदनामी, सायबर छळ व सामाजिक अशांततेला खतपाणी घालणारे आहेत”, असाही आरोप मॉडर्न प्रशासनाने केला.
Modern College of Arts Science and Commerce
बीबीसी मराठीशी बोलताना प्रेम बिऱ्हाडे म्हणाला, “कॉलेजनं पत्रक काढून माझ्यावर आरोप केल्यानंतर मला असं सांगितलं आहे की, आम्ही तुमचं व्हेरिफिकेशन करायला तयार आहोत, पण आता माझ्या हातून ती नोकरी गेलेली आहे.”
“मला कॉलेजकडून फक्त आणि फक्त व्हेरिफिकेशची गरज होती, माझ्या कंपनीतून जेव्हा कॉलेज प्रशासनाला मेल आला तेव्हा त्यांचं काम इतकंच होतं की, मी या कॉलेजचा विद्यार्थी आहे हे सांगणं. पण कॉलेजने हे करण्यात टाळाटाळ केली. मी त्यांना माझी शिफारस करा, अशी विनंती केली नव्हती. माझा जेव्हा प्रवेश झाला, तेव्हा याच कॉलेजने मला दोन शिफारस पत्र दिली होती,” असंही प्रेमनं सांगितलं.
“यामुळे आता हे करुन काहीही उपयोग नाही. माझी नोकरी गेली आहे आणि ती मला आता परत मिळणार नाही. माझ्यासोबत जे काही घडलंय ते केवळ जातीय मानसिकतेतून झालं आहे. माझी नोकरी जाण्यासाठी मॉडर्न आर्ट्स, कॉमर्स कॉलेज हेच पूर्णपणे जबाबदार आहे,” असा आरोप प्रेमनं केला आहे.
‘जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई केली पाहिजे’
वंचित बहुजन आघाडीचे महासचिव वकील






