कोरोना काळात मदतीचा हात, आता धर्मयात्रांमधून जनसंपर्क — शिवले यांची वाटचाल
पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. या गटात वढु बुद्रुकचे माजी सरपंच प्रफुल्ल शिवले हे प्रमुख इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आले आहेत. गेल्या काही वर्षांत सामाजिक, धार्मिक आणि लोकसेवा क्षेत्रात त्यांनी दाखवलेली सक्रियता आणि प्रभावी जनसंपर्क यामुळे त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.
अलीकडेच प्रफुल्ल शिवले यांनी तब्बल १५ हजार भाविकांसाठी पाच रेल्वेगाड्यांमधून उज्जैन-महाकालेश्वर मंदिर धार्मिक यात्रेचे आयोजन केले होते. महिलांसह सर्व समाजघटकांचा सहभाग असलेल्या या यात्रेमुळे त्यांच्या जनसंपर्कात अधिकच भर पडला आहे. पुढील काही महिन्यांत आणखी तीन धार्मिक यात्रांचे नियोजन सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहे. धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे त्यांच्या लोकप्रियतेत मोठी भर पडली असून पाबळ-केंदूर, धामारी, वढु बुद्रुक, केंदूर, जातेगाव, मुखई, हिवरे, खैरेनगर, करंदी, पिंपळे-जगताप, वाजेवाडी आणि आपटी अशा गावांमध्ये त्यांचे प्रभावी जाळे तयार झाले आहे.
कोरोना महामारीच्या काळात प्रफुल्ल शिवले यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी आजही लोकांच्या स्मरणात आहे. त्यांनी स्वतःच्या पुढाकाराने २०० बेडचे कोरोना सेंटर सुरू केले होते आणि रात्रंदिवस रुग्णसेवेत स्वतः झोकून दिले होते. या कार्यामुळे त्यांच्या नावाला जनमानसात एक वेगळा आदर प्राप्त झाला.
प्रफुल्ल शिवले यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध असल्याने ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून त्यांना पाठिंबा मिळू शकतो, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवले यांनी ग्रामपंचायत, सहकारी संस्था आणि स्थानिक विकासकामांमधून तयार केलेले मजबूत नेटवर्क हे त्यांच्या राजकीय शक्तीचे प्रमुख कारण मानले जाते.
मागील निवडणुकीत अल्पमताने झालेला पराभव लक्षात घेता यंदा त्यांनी अधिक नियोजनबद्ध आणि सर्वसमावेशक जनसंपर्काचा मार्ग स्वीकारला आहे. धार्मिक यात्रांमुळे निर्माण झालेला सामाजिक संवाद, कोरोना काळातील सेवाभाव, विकासकामांचा अनुभव आणि सर्वपक्षीय संवाद या सर्वांचा परिणाम त्यांच्या बाजूने सकारात्मक दिसतो आहे.आरक्षण जाहीर झाल्यानंतर पाबळ-केंदूर गटातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. अनेक इच्छुकांची चाचपणी सुरू असली तरी सध्या तरी शिवले यांना तगडा प्रतिस्पर्धी उमेदवार दिसत नाही. त्यामुळे हा गट ‘सुपर वन मॅन शो’ ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, स्थानिक स्तरावर विरोधकांचे अंतर्गत गटबाजी आणि नव्या उमेदवारांच्या हालचालीमुळे लढत रंगतदार होण्याचीही चिन्हे आहेत.
सरतेशेवटी, पाबळ-केंदूर गटात खऱ्या अर्थाने संघर्षमय निवडणूक होते की प्रफुल्ल शिवले यांचा विजयाचा मार्ग सुकर होतो, हे आगामी काही महिन्यांत स्पष्ट होणार आहे. पण एवढं निश्चित — या गटातली निवडणूक ही प्रफुल्ल शिवले यांच्या सामाजिक कार्याच्या, लोकप्रियतेच्या आणि राजकीय संघटनशक्तीच्या परिक्षेची ठरणार आहे.