“ही निवडणूक लढणार म्हणजे लढणारच आहे!” — असा ठाम निर्धार व्यक्त करत लोणीकंद ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल वाजवला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या आरक्षणानुसार लोणीकंद–पेरणे गट मागासवर्ग (OBC) प्रवर्गासाठी राखीव ठरला असून, झुरुंगे यांच्या उमेदवारीला यामुळे गती मिळाली आहे.
गेल्या काही वर्षांत योगेश झुरुंगे यांनी सामाजिक, धार्मिक आणि स्थानिक प्रश्नांवर सक्रियपणे काम करत जनसंपर्काची भक्कम पायाभरणी केली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे ते या गटातील प्रमुख इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आले आहेत.आरक्षण जाहीर झाल्यानंतर योगेश झुरुंगे यांनी तत्काळ प्रचाराची तयारी सुरू केली असून लोणीकंद, फुलगाव, तुळापूर, वडगाव शिंदे, निरगुडी, भावडी, पेरणे, वढू खुर्द, बकोरी, डोंगरगाव, बुर्केगाव आणि पिंपरी सांडस या गावांमध्ये भेटीगाठी सुरू केल्या आहेत. लोकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर त्यांनी भर दिला आहे.स्थानिक तरुणाई, ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांकडून झुरुंगे यांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता या गटातील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
“माझा उद्देश सत्तेचा नाही, सेवाभावाचा आहे. मी या भूमीचा मुलगा आहे आणि लोकांसाठी झटणं हेच माझं कर्तव्य आहे. विकास, शिक्षण, रोजगार आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर ठोस योजना घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे असे योगेश झुरूंगे यांनी सांगितले.”दरम्यान, त्यांच्या या घोषणेनंतर लोणीकंद–पेरणे परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी काही दिवसांत झुरुंगे यांच्या प्रचारयात्रा आणि संपर्क मोहिमा अधिक वेग घेतील, अशी चिन्हे दिसत आहेत. या गटातील निवडणूक आता अधिकच रंगतदार होणार आहे.