विठ्ठल वळसे पाटील लिखित ‘निसर्ग दाता’ या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा ग्रंथ स्व. अॅड. अविनाश रहाणे व ज्येष्ठ पत्रकार स्व. के. डी. गव्हाणे यांना समर्पित करण्यात आला
वाघोली/प्रतिनिधी
निसर्ग व भूगर्भात होत असलेले बदल अत्यंत गंभीर असून त्याचे थेट दुष्परिणाम पर्यावरणावर होत आहेत. निसर्गावर मात करण्याच्या प्रयत्नात मानवच निसर्गाचा शत्रू बनत असून संकटे स्वतः ओढवून घेत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी समाजाने निसर्गाबाबत आत्मपरीक्षण करून पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे ठाम मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, संभाजीनगरचे निवृत्त प्राचार्य डॉ. दत्ता देशकर यांनी व्यक्त केले.
बकोरी देवराई वनराई प्रकल्प व सेवा समर्पण सोशल फाउंडेशनच्या वतीने बकोरी येथील वनराई प्रकल्पामध्ये स्तंभलेखक विठ्ठल वळसे पाटील लिखित ‘निसर्ग दाता’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती सेवा समितीचे राज्याध्यक्ष तथा माहिती सेवा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे होते.
यावेळी बोलताना डॉ. देशकर म्हणाले की, “मी आजपासून एक वेगळा पायंडा पाडत असून, मी प्रकाशित झालेले पुस्तक सर्वप्रथम स्वतः विकत घेतो. कारण लेखक विठ्ठल वळसे पाटील यांचे लेखन हे वैचारिक असून समाजाला विचार करायला लावणारे आहे.” आज प्रत्येक व्यक्ती दररोज जवळपास ६० ग्रॅम रासायनिक घटक अप्रत्यक्षपणे नद्यांमध्ये सोडत असल्याने नदीप्रदूषण वाढत आहे. परिणामी साथरोग व विविध आजार वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आपण स्वीकारलेल्या नव्या पद्धतीच आपल्यासाठी घातक ठरत असून ‘निसर्गावर मात’ करण्याच्या अट्टहासामुळे आपण निसर्गाला हानी पोहोचवत आहोत. निवृत्तीनंतर पाण्याच्या विषयाने माझा नवा जन्म झाला असून मी पाणीदार झालो आहे. गेली २० ते २५ वर्षे पाण्यावर काम करत एक लाख मुलांना जलसाक्षर करण्याचा संकल्प एका वर्षात पूर्ण केला. त्यानंतर शेतकरी वर्गातही जलजागृती केल्याचे त्यांनी सांगितले.
“धावते पाणी चालते करा,
चालते पाणी रांगते करा,
रांगते पाणी थांबते करा,
थांबते पाणी झिरते करा,”
या संदेशावर आधारित कामातून भूजल संवर्धनाचा मार्ग दाखवण्यात आला. आज भूजल पातळी खालावल्यामुळे नद्या कोरड्या पडत असून ‘जास्त पाणी म्हणजे जास्त पीक’ ही संकल्पना चुकीची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.गावपातळीवरील तरुण सरपंचांना जलसमृद्धीचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
तर प्रमुख पाहुणे सचिन लोखंडे (विस्तार अधिकारी, भोर) यांनी निसर्गाशिवाय जीवन अपूर्ण असल्याचे सांगत निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत वारघडे यांनी वाढता निसर्गाचा ऱ्हास हा पक्ष्यांच्या स्थलांतरास कारणीभूत ठरत असल्याचे सांगून देशी वृक्षरोपणाच्या माध्यमातून पशु-पक्ष्यांना स्वावलंबी बनवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
संत व समाजसुधारक विचार केंद्राचे संस्थापक उत्तमराव भोंडवे यांनी वाढत्या रासायनिक शेतीबाबत चिंता व्यक्त केली. मातृरक्षा प्रकाशन संस्थेच्या प्रकाशिका स्वाती इंगळे, शिक्रापूरचे माजी उपसरपंच व लेखक मयूर करंजे पाटील यांनीही आपले विचार मांडले.
कार्यक्रमाची सुरुवात वनराई परिसरात वृक्षरोपणाने करण्यात आली. ‘निसर्ग दाता’ या पुस्तकाची पहिली प्रत ज्येष्ठ पत्रकार स्व. के. डी. गव्हाणे यांच्या कन्या श्वेता गव्हाणे, पुत्र अभिजीत गव्हाणे व भाऊ विनोद गव्हाणे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. हा वैचारिक ग्रंथ पत्रकारितेचे धडे घेतलेले स्व. शिवसेना नेते स्व. अॅड. अविनाश रहाणे व ज्येष्ठ पत्रकार स्व. के. डी. गव्हाणे यांना अर्पण केल्याची माहिती लेखक विठ्ठल वळसे पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले, जितेंद्र आव्हाळे, सचिन धुमाळ, चेतन दिघे, दिपक नायक, शेरखान शेख,पोपट मांजरे,गजानन गव्हाणे,विजय लोखंडे, शंकर पाबळे,पाठ्यपुस्तकातील कवी सचिन बेंडभर, अखिल भारतीय परिषदेचे शिरूर अध्यक्ष राहुल चातुर, प्रा. कुंडलिक कदम, गुरुनाथ पाटील, कवी आकाश भोरडे, गणेश साळुंखे, प्रभाकर मुसळे, ज्ञानेश्वर पाटेकर, नितीन शिंदे, विनोद गव्हाणे, संभाजी गोरडे, गणेश थोरात, संभाजी चौधरी, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, श्रीकांत वाळूंज तसेच विविध निसर्ग संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पत्रकार गणेश सातव यांनी केले, तर आभार प्रदर्शन लेखक विठ्ठल वळसे पाटील यांनी केले.