ठाकरे बंधूंच्या युतीवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, ते.”
मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेने राजकीय युतीची अधिकृत घोषणा केली आहे.
आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेत दोन्ही नेत्यांनी महापालिका निवडणुका एकत्र लढवणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान यावेळी जागावाटप जाहीर करण्यात आले नाही. या युतीच्या घोषणेनंतर सत्ताधारी पक्षातील नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर जोरदार टीक करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ही युती खूर्चीसाठी आणि सत्तेसाठी असल्याचे म्हटले आहे.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “लोकशाहीमध्ये युती-आघाडी होत असतात, पण काही युत्या राज्याच्या आणि जनतेच्या भल्यासाठी होत असतात. जसे आमची महायुती गेले साडेतीन वर्ष राज्याला पुढे नेण्यासाठी काम करत आहे. पण आता झालेल्या युत्या सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी, आपले अस्तित्व टिकवण्यासाठी झालेल्या आहेत”
आम्ही लोकसभा, विधानसभा महायुतीने जिंकलोय. नगरपरिषदांमध्ये महाविकास आघाडीच्या एकूण नगराध्यक्षांच्या जितक्या जागा आल्या त्यापेक्षा एकट्या शिवसेनेच्या, जास्त जागा आल्या. त्यामुळे अशा युत्या या सत्तेसाठी, स्वार्थासाठी आणि आपले अस्तित्व टिकवण्यासाठी आहेत. काही लोक मुंबईकडे सोन्याचे अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहातात. आधी अंडी खात होते आता कोंबडी कापण्यासाठी आले असतील, असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
दरम्यान जागावाटप का जाहीर केलं नाही याबद्दल विचारले असता, राज्यात पोरं पळवणारी टोळी सक्रिय असल्याचे विधान राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केले होते. उमेदवार फोडण्यावरून ठाकरेंनी हे विधान केले. याबद्दल एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शिंदेंनी राज ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. “जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, ते मुंबई आणि राज्य काय सांभाळणार,” असा टोला एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंना लगावला.
तसेच मराठी माणसाला साद घालणाऱ्या उद्धव ठाकरेंवरही शिंदेंनी जोरदार टीका केली, ते म्हणाले की, “मराठी माणूस आत्ता आठवला? मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला. मराठी माणसाचं खच्चीकरण झालं, तेव्हा मराठी माणूस आठवला नाही. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा बोर्ड लागतात की मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार. तुम्ही एक तरी गिरणी कामगाराला घर दिलं? आम्ही साडेबारा हजार लोकांना घरे दिली. एक लाख गिरणी कामगारांना आम्ही घरे देणार आहोत. ३५ ते ४० लाख लोकांना टप्प्याटप्प्याने या क्लस्टरच्या योजनेत घेणार आहोत. तुमच्याकडे योजना आहे? इतके वर्ष सत्ता गाजवली काय केलं मुंबईकरांसाठी? मुंबईकर सुज्ञ आहेत. या निवडणुकीत त्यांना विकास पाहिजे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
“फक्त आणि फक्त स्वतःसाठी काय मिळवायचं हा विचार या लोकांनी केला आहे. त्यामुळे हे एकत्र आले आहेत ते फक्त स्वर्थासाठी आणि स्वत:च्या खुर्चीसाठी आले आहेत,” अशी टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली.
राज ठाकरे काय म्हणाले?
“मला बाकी जे बोलायचं आहे ते जाहीर सभांमधून मी बोलेन. मात्र, मी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं होतं की, कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि तिथून आम्ही (मनसे-ठाकरे गट) एकत्र येण्याची सुरुवात झाली. आता कोण किती जागा लढवणार? आकडा काय? हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. कारण महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरतायत, त्यात दोन व्यक्ती समाविष्ट झाल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात”, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदेसेनेला लगावला आहे.






