भाजप पाठोपाठ शिंदेसेनेची MIM सोबत युती? सनसनाटी दाव्यानं खळबळ; ‘इस्लाम’ सत्तेबाहेर ?
नाशिकः अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत भाजप-एमआयएम युतीची घडामोड ताजी असताना शिंदेसेनेनं एमआयएम सोबत युती करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. हिंदुत्त्वासाठी उद्धव ठाकरेंची साथ सोडली, असं वारंवार सांगणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं एमआयएमकडे पाठिंबा मागितल्याची माहिती पुढे आल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
शिंदेसेनेनं आमच्याकडे पाठिंबा मागितला होता, असा दावा एमआयएमचे नेते आणि माजी खासदार एम्तियाज जलील यांनी केला आहे.मालेगाव महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं आमच्याकडे पाठिंबा मागितला होता. पण आम्ही त्यांना स्पष्ट नकार दिला, असा सनसनाटी दावा एमआयएमचे नेते एम्तियाज जलील यांनी केला आहे. मालेगाव महापालिकेत एकूण ८४ जागा आहेत. पैकी सर्वाधिक ३५ जागा इस्लाम पक्षानं जिंकल्या आहेत. तर एमआयएमनं २१ आणि शिंदेसेनेनं १८ जागा जिंकल्या आहेत. एमआयएम आणि शिंदेसेनेचा एकत्रित आकडा ३९ च्या घरात जातो. ही बेरीज जमल्यास आणि आणखी ४ नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यास इस्लाम पक्षाला बाजूला सारुन शिंदेसेना आणि एमआयएमची सत्ता येऊ शकते.तीन-चार महापालिकांमध्ये एमआयएम किंगमेकर आहे. त्यामुळे आम्हाला काही पक्षांकडून विचारणा होत आहे. काहींनी तसे प्रस्ताव आम्हाला दिले आहेत, अशी माहिती एमआयएमचे नेते एम्तियाज जलील यांनी दिली. शिंदेसेनेनं मालेगावात आमच्याकडे पाठिंबा मागितला. पण आम्ही त्यांना स्पष्ट शब्दांत नकार दिला. शिंदेसेना आणि भाजप यांच्या सोबत कोणत्याही स्थितीत युती होऊ शकत नाही, असं जलील यांनी स्पष्ट केलं.शिंदेसेना आणि भाजप यांना सोडून अन्य पक्षांनी पाठिंब्यासाठी विचारणा केल्यास नक्कीच विचार करु. महापौर किंवा अन्य समित्यांसाठी अन्य पक्षांकडून पाठिंबा मागितला जात असेल, तर त्याबद्दलचे प्रस्ताव पाठवा, अशी सूचना आम्ही नगरसेवकांना केली आहे. पण शिंदेसेना आणि भाजप सोबत युती होणार नाही, असं जलील यांनी सांगितलं. अन्य पक्षांनी सन्मानजनक प्रस्ताव दिले, तर नक्कीच विचार करु, असं जलील यांनी म्हटलं.मालेगाव महापालिकेत एकूण ८४ जागा आहेत. पैकी ३५ जागा इस्लाम पक्षानं जिंकल्या आहेत. एमआयएमनं २१, शिंदेसेनेनं १८ जागांवर यश मिळवलं आहे. समाजवादी पक्षाला ६, काँग्रेसला ३ आणि भाजपला २ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर ठाकरेसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मालेगावात भोपळाही फोडता आलेला नाही.






