कल्याण डोंबिवलीत मोठा ट्विस्ट, मनसेचे 7 नगरसेवक शिंदे सेनेला पाठिंबा देण्याची चर्चा, ठाकरे गटाला धक्का?
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्तास्थापनेसाठी सध्या नाट्यमय घडामोडी सुरु आहेत. अशातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला राज ठाकरे यांच्या मनसेकडून पाठिंबा दिला जाणार आहे.
सध्या शिंदे गट आणि मनसेच्या नेत्यांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये कल्याण डोंबिवलीत राजकीय हालचाली घडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मनसेने शिंदे गटाला पाठिंबा दिल्यास कल्याण डोंबिवलीत ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करायची असेल तर 62 हा बहुमताचा आकडा गाठणे महत्त्वाचे आहे. सध्या शिंदे यांच्या शिवसेनेकडे 53 नगरसेवक आहेत. तर भाजपाकडे 50 नगरसेवक आहेत. तर या निवडणुकीत ठाकरे गटाचे 11 आणि मनसेचे पाच नगरसेवक निवडून आले होते. मात्र, निकालानंतर ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता झाले होते. हे दोन्ही नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला लागल्याची चर्चा होती. अशातच ठाकरे गट कोकण विभागीय आयुक्तांकडे आपल्या गटाची नोंदणी करायला जाताना आणखी दोन नगरसेवक गैरहजर होते. हे नगरसेवक मनसेच्या गोटात गेल्याची चर्चा होती. त्यामुळे ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे संख्याबळ 11 वरुन सातवर आले होते. ठाकरे गटाचे जे दोन नगरसेवक मनसेत गेले होते, ते पूर्वी मनसेचे कार्यकर्ते होते. त्यामुळे आम्ही मनसेत गेल्याची भूमिका या दोन्ही नगरसेवकांनी घेतली आहे. आता हे दोन आणि मनसेचे निवडून आलेले 5 नगरसेवक असे 7 नगरसेवक सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतात. शिंदे गटाचे नेते यासंदर्भात मनसेशी चर्चा करत असले तरी यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडून येऊन पुन्हा मनसेत गेलेल्या नगरसेवकांबद्दल संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. कल्याण डोंबिवलीत जे नगरसेवक गट बनवण्यासाठी उपस्थित राहत नाहीत, त्यांच्यावर अपात्रतेसंदर्भातील कारवाई सुरु आहे. ती कारवाई यशस्वी होईल, ते कुठेही गेलेले असू द्या. ते पक्षाची आचारसंहिता आणि निवडणुकीची आचारसंहिता पाळत नसतील तर त्यांच्यावर कारवाई होईल. ते दोन्ही नगरसेवक मनसेचे कार्यकर्ते असले तरी ते मशालीच्या चिन्हावर निवडून आले आहेत. ते पूर्वी मनसेचे कार्यकर्ते होते, हा निकष लावायचा झाला तर आज भाजपमध्ये गेलेले अनेकजण काँग्रेसचे आहेत आणि राष्ट्रवादीचे अनेक विजयी उमेदवार शरद पवार गटाचे आहेत. पण म्हणून त्यांना परत बोलावता येणार नाही. काही गोष्टी नैतिकता आणि नितिमत्तेला धरुन कराव्यात, असे संजय राऊत यांनी म्हटले.
कल्याण-डोंबिवलीतील शिंदे गटाचे 53 नगरसेवक बुधवारी सकाळी कोकण भवनच्या दिशेने रवाना झाले. कोकण भवनात शिंदे गटाच्या नगरसेवकांच्या गटाची नोंदणी केली जाईल. शिवसेनेचा अधिकृत गट स्थापन करण्यासाठी काल बैठक देखील पार पडली होती.






