Home » ताज्या बातम्या » नाशिककरांची सत्वपरीक्षा! द्वारका अंडरपासचे काम फेब्रुवारीत सुरू; वाहतुकीत मोठे बदल

नाशिककरांची सत्वपरीक्षा! द्वारका अंडरपासचे काम फेब्रुवारीत सुरू; वाहतुकीत मोठे बदल

Facebook
Twitter
WhatsApp
24 Views

नाशिककरांची सत्वपरीक्षा! द्वारका अंडरपासचे काम फेब्रुवारीत सुरू; वाहतुकीत मोठे बदल

 

नाशिक: आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर द्वारका सर्कल येथे अंडरपासच्या (भुयारी मार्ग) कामाला फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडीच्या समस्येने समस्त नाशिककर बेजार झालेले असतानाच, या कामासाठी येथील मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येईल.

या कामानिमित्त शहर वाहतूक विभागाकडून द्वारका चौकातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या कामामुळे नाशिक शहरातून नाशिक रोड व नाशिक रोडकडून नाशिककडे येणाऱ्या पर्यायी मार्गांवर वाहतुकीचा अतिरिक्त ताण येईल.

आगामी कुंभमेळा अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपला आहे. सिंहस्थासाठी देशभरातून भाविक नाशिकला येतील. त्यामुळे शहरात भाविकांची जशी गर्दी होणार आहे, तशीच वाहनांचीही संख्या वाढणार आहे. यामुळे शहराच्या रहदारीवर अतिरिक्त ताण येणार आहे. त्या अनुषंगाने शहरातील रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहे. यात प्रामुख्याने द्वारका येथील वाहतूक कोंडीची समस्या बिकट आहे.

येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आत्तापर्यंत अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु येथील वाहतूक कोंडी सुटू शकलेली नाही. द्वारका सर्कलवरील वाहतूक कोंडीने समस्त नाशिककरांना त्रास सहन करावा लागतो आहे. त्यातच द्वारका सर्कलच्या अंडरपासच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार असून, वाहने पर्यायी मार्गांने वळविण्यात येतील. यामुळे वाहनचालकांच्या डोकेदुखीत भर पडणार आहे.

द्वारका सर्कलची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी यापूर्वी पादचाऱ्यांसाठी अंडरपास करण्यात आला. परंतु त्याचा वापर न झाल्याने तो बंद अवस्थेत आहे. या चौकात सातपेक्षा अधिक रस्ते येऊन मिळतात. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच. ती सोडविण्यासाठी सर्कल हटविण्यात आले. स्वतंत्र वाहतूक युनिट याठिकाणी कार्यरत करण्यात आले. तरीही येथील वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे अशीच आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे यांनी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी अंडरपास मंजूर करण्यात आला.

पर्यायी मार्ग ठरणार डोकेदुखी

शहरातून नाशिक रोडकडे व नाशिक रोडकडून नाशिककडे येण्यासाठी द्वारका चौफुलीवरून वाहने ये-जा करतात. अंडरपासच्या कामासाठी द्वारका सर्कल बंद केले जाणार आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल. पर्यायी मार्गात वडाळा रोड, मुंबई नाका, इंदिरानगर बोगदा, राजीवनगर, राणेनगर, पाथर्डी फाटा या मार्गांचा वापर केला जाणार आहे. मुंबई नाका सर्कलवरील कोंडीत यामुळे भर पडणार आहे.

भाभानगर मार्गे वाहतूक काठेगल्ली सिग्नलवरून नाशिक रोडकडे जाईल आणि येईल. परंतू हा रस्ता रहदारीसाठी अरुंद असल्याने अतिरिक्त वाहतुकीचा ताण पडून याही रस्त्यावर कोंडी उद्‌भवणार आहे. अशीच अवस्था इंदिरानगर बोगदा ते गांधीनगर सिग्नल रस्त्याची होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच इंदिरानगरवासीयांनी या मार्गावरून अवजड वाहनांच्या वाहतुकीला विरोध केलेला आहे. यामुळे द्वारका सर्कल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर पर्यायी मार्ग वाहनचालकांसाठी सुलभ व सुकर असावेत, अशी अपेक्षा वाहनचालकांची आहे.

वाहतूक शाखेच्या बैठका

द्वारका भुयारी मार्गाच्या कामासाठी द्वारका सर्कल बंद करण्यात येणार आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यासाठी शहर वाहतूक पोलिस विभाग आणि महापालिका यांच्यात सातत्याने बैठका होत आहेत. या बैठकांमध्ये पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविताना काही मार्ग एकेरी वाहतुकीसाठी करण्याच्या मुद्यावर चर्चा सुरू आहे; तर अवजड वाहने महामार्गाच्या सर्व्हिस रोडऐवजी उड्डाणपुलाचा वापर केला जाण्याची शक्यता आहे; तर परजिल्ह्यांतून येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसना शहरातील महामार्ग, ठक्कर बझार व मेळा बसस्थानकावर येण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांवरून वळविण्याण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!