Home » राजकारण » मशालीवर निवडून आलेले नगरसेवक मनसेत गेले तरी कारवाई होणार, राऊतांनी स्पष्टच सांगितले

मशालीवर निवडून आलेले नगरसेवक मनसेत गेले तरी कारवाई होणार, राऊतांनी स्पष्टच सांगितले

Facebook
Twitter
WhatsApp
9 Views

मशालीवर निवडून आलेले नगरसेवक मनसेत गेले तरी कारवाई होणार, राऊतांनी स्पष्टच सांगितले

 

मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांची युती झाली होती. शिवसेनेला 53 तर भाजपला 50 जागांवर विजय मिळाला. शिवाय ठाकरे गट 11, मनसे 5 आणि शरद पवार गटाला 1 जागा मिळाली आहे.

तसेच काँग्रेसने 2 जागा जिंकल्या आहेत. आता भाजप आणि शिवसेनेकडून स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न केले जात आहेत. अशातच, मंगळवारी (ता. 20 जानेवारी) जेव्हा कोकण विभागीय आयुक्तांकडे पक्षाच्या गटाच्या नोंदणीसाठी ठाकरेंच्या नगरसेवकांना हजर राहण्यास सांगण्यात आले, तेव्हा ठाकरेंचे कल्याण डोंबिवलीतील 11 नगरसेवकांपैकी केवळ 7 च नगरसेवक उपस्थित होते. ज्यामुळे ठाकरेंचे 2 नगरसेवक शिंदेंकडे आणि 2 नगरसेवक हे मनसेत गेल्याची चर्चा सुरू आहे. पण मशालीवर निवडून आलेला कोणताही नगरसेवक कुठेही गेला तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणारच, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी (ता. 21 जानेवारी) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कल्याण डोंबिवली महापालिकेतील चार नगरसेवक नॉट रिचेबल असण्याबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा याबाबत खासदार राऊत म्हणाले की, जे सदस्य गट निर्मितीसाठी उपस्थित राहत नाहीत, त्यांच्यावर अपात्रतेची कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि ती यशस्वी होईल. मशाल चिन्हावर निवडून आलेले सर्व लोक आता पक्षाचेच आहेत. पक्षाची आचारसंहिता किंवा निवडणूक आयोगाचे नियम न पाळल्यास कारवाई केली जाईल. त्यामुळे ठाकरेंच्या मशालीवर विजयी झालेला कोणताही नगरसेवक कुठेही गेल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणारच, असे यावेळी राऊतांकडून स्पष्टपणे सांगण्यात आले.

तसेच, भाजपमध्ये अर्धे लोक काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून गेलेले आहेत. मात्र ते भाजपच्या चिन्हावर निवडून आले म्हणून शरद पवार त्यांना परत बोलावणार नाहीत. काही गोष्टी नैतिकता, नीतिमत्ता आणि कायद्याच्या चौकटीतच कराव्या लागतात आणि नियम न पाळणाऱ्यांना अपात्र ठरवले जाईल, असेही यावेळी राऊतांनी स्पष्ट केले. तर, आतली माहिती अशी आहे की शिंदे गटाला महापौर पदासाठी कोणीही गांभीर्याने विचारात घेत नाही. मुंबईच्या महापौर पदासाठी शिवसेनेचे नाव घेणाऱ्यांना आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावणाऱ्यांना दिल्लीला जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावे लागत आहे, याहून अपमानास्पद गोष्ट दुसरी नाही, असे टीकास्त्रही यावेळी खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर डागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!