वडगाव रासाई–मांडवगण जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ) पक्षाच्या वतीने सौ सुजाता अशोक पवार यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी आमदार अशोक पवार यांच्या सौभाग्यवती असलेल्या सुजाता पवार यांच्या उमेदवारीमुळे या गटातील निवडणूक लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मागील जिल्हा परिषद कार्यकाळात सुजाता पवार यांनी राबवलेल्या विकासकामांमुळे त्यांची जनमानसात ‘काम करणारी लोकप्रतिनिधी’ अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांमुळे त्या परिसरात परिचित असून, या कामगिरीचा फायदा आगामी निवडणुकीत त्यांना होणार असल्याचे बोलले जात आहे.
घड्याळ चिन्हावर सुजाता पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक पातळीवर पक्ष संघटन अधिक मजबूत होत असून निवडणूक प्रचारात नवचैतन्य दिसून येत आहे.
वडगाव रासाई–मांडवगण गटातील निवडणूक आता अधिक चुरशीची होणार असून, घड्याळ चिन्हावर लढणाऱ्या सुजाता पवार यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.