Home » ताज्या बातम्या » पुण्यात भाजपकडून महापौरपदासाठी रत्नमाला सातव यांचे नाव आघाडीवर

पुण्यात भाजपकडून महापौरपदासाठी रत्नमाला सातव यांचे नाव आघाडीवर

Facebook
Twitter
WhatsApp
881 Views
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर शहराच्या राजकारणात महापौरपदाच्या चर्चेला वेग आला असून आज महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली यामध्ये पुणे महानगरपालिकेवर महिलाराज येणार आहे हे जाहीर झाले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून अनेक महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत. मात्र या सर्वांमध्ये वाघोली येथून विजयी झालेल्या रत्नमाला सातव यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे.
रत्नमाला सातव यांनी पुणे शहरात विक्रमी कामगिरी करत ४१ हजार ५६० मते मिळवली असून त्या शहरातील सर्वाधिक मते मिळवणाऱ्या उमेदवार ठरल्या आहेत. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर २३ हजार १३६ मतांचे मोठे मताधिक्य मिळवत दणदणीत विजय नोंदवला आहे. या विजयामुळे भाजपच्या गोटात त्यांचे राजकीय वजन लक्षणीयरीत्या वाढले आहे.
विशेष बाब म्हणजे वाघोली हा भाग पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेला असून, हा परिसर ग्रामीण आणि शहरी सीमारेषेवरचा मानला जातो. या भागातून भाजपला मोठे मताधिक्य मिळाल्याने, नव्याने समाविष्ट झालेल्या भागांना प्रतिनिधित्व देण्याचा पक्षाचा संदेश यामागे असल्याचे बोलले जात आहे . ग्रामीण भागात भाजपचा विस्तार करण्याच्या दृष्टीने वाघोलीसारख्या भागाला महत्त्वाचे प्रतिनिधित्व दिले जाऊ शकते, अशी चर्चा पक्षांतर्गत सुरू आहे.
रत्नमाला सातव या तुलनेने तरुण चेहरा असून, महिलांचे नेतृत्व, मजबूत जनाधार आणि संघटनात्मक कामाचा अनुभव या बाबी त्यांच्या जमेच्या बाजू ठरत आहेत. त्यामुळे भविष्यातील राजकारणाचा विचार करता भाजपकडून नव्या नेतृत्वाला संधी देण्याची भूमिका घेतली जाऊ शकते, असेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
भाजपने यापूर्वीही अनेक वेळा महत्त्वाच्या पदांवर धक्कातंत्राचा वापर करत अनपेक्षित निर्णय घेतले आहेत. त्यामुळे महापौर पदासाठी  देखील परंपरागत नावांपेक्षा मोठे मताधिक्य, नव्या भागाचे प्रतिनिधित्व आणि तरुण चेहरा या निकषांवर रत्नमाला सातव यांचे नाव महापौरपदासाठी पुढे येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
महापौरपदाचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेतला जाणार असला, तरी सध्याच्या राजकीय हालचाली आणि अंतर्गत चर्चांचा विचार करता रत्नमाला सातव यांचे नाव भाजपच्या महापौरपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!