राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? मुंबईत बिहार भवन बांधण्यावरुन ठिणगी, मंत्र्याची जहरी टीका
मुंबईत बिहार भवन बांधण्यावरुन सध्या जोरदार राजकीय वाद सुरु झाला असून मनसे आणि ठाकरे सेनेने याला विरोध केला आहे. प्रत्युत्तरात, जेडीयू आणि भाजपने दोन्ही पक्षांना इशारा देत मुंबईतबिहार भवन नक्कीच बांधले जाईल, असं म्हटलं आहे.
आता मनसे आणि शिवसेना नेत्यांच्या विधानांवर बिहार सरकारचे मंत्री अशोक चौधरी यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त दिली. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात बिहार भवन बांधू असं विधान बिहारच्या मंत्र्यांनी केले आहे. बिहार भवन बांधण्याचे काम थांबवण्याएवढी ताकद कोणामध्येही नसल्याचे अशोक चौधरी म्हणाले. अशोक चौधरी यांनी राज ठाकरे यांना निरुपयोगी व्यक्तीही म्हटले.
“हा देश आहे की कुणाची जबरदस्ती चालणार आहे. नाही बनू देणार म्हणतात. राज ठाकरे हे महाराष्ट्रातले राजे आहेत का? फालतू गोष्टी सुरु आहेत. उपचारांसाठी महाराष्ट्रात जाणाऱ्यांसाठी ते बांधले जात आहे. आणखी राज्यांमध्ये बांधणार आहेत. बिहार भवन राज्यातील जनतेसाठी असंख्य सुविधा प्रदान करेल. हे कोणत्याही राजकीय अजेंडाचा भाग म्हणून नाही तर मानवी गरजांना प्रतिसाद म्हणून बांधले जात आहे,” असे अशोक चौधरी म्हणाले.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने बिहार भवनला स्थानिक संसाधनांवर ओझे आणि प्रादेशिक राजकारणाने प्रेरित म्हटले. पक्षाचे नेते विनायक राऊत म्हणाले, “मुंबईची जमीन बळकावण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उद्या हे लोक वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये गुजरात भवनही बांधू शकतात,” असं म्हटलं. संजय राऊत यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, आता मुंबई महापालिकेत शिवसेना सत्तेत आली आहे, त्यामुळे या मुद्द्यावर त्यांचे विचार मांडणे ही त्यांची जबाबदारी आहे. शिंदे गट स्वतःला शिवसेना म्हणत असल्याने, या मुद्द्यावर बोलणे आणि आवश्यक असल्यास निषेध करणे ही त्यांची जबाबदारी आहे.
याचे राजकारण करणे चुकीचे असल्याचे शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम म्हणाले. “मनसेने विरोध करणे चुकीचे आहे. ही इमारत कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आहे. याला विरोध करणारे, विशेषतः मनसे, यात काय भूमिका बजावतात? हा प्रकल्प मानवतेबद्दल आहे आणि त्याचे राजकारण करणे दुर्दैवी आहे, असं संजय निरुपम म्हणाले.
दरम्यान, बिहार फाउंडेशन (मुंबई) चे अध्यक्ष कैसर खालिद म्हणाले की, बिहार भवनच्या माध्यमातून मुंबई ते बिहार उद्योग आणि गुंतवणूकीला चालना देण्यासाठी रणनीती ठरवली जाईल. इमारत बांधकाम विभागाचे सचिव कुमार रवी म्हणाले की, ही इमारत पर्यावरणपूरक असेल. बिहार भवन ३० मजली उंच असेल. नितीश सरकार दक्षिण मुंबईतील एल्फिन्स्टन इस्टेटमध्ये ते बांधणार आहे. ही मुंबई पोर्ट ट्रस्टची जमीन आहे.
नितीश सरकारने ३० मजली उंच इमारतीसाठी ३१४.२० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देखील दिली आहे. ही इमारत तळघरासह ३० मजली उंच असेल. त्याची उंची अंदाजे ६९ मीटर असेल. यात एकूण १७८ खोल्या असतील, ज्या सरकारी अधिकारी, पाहुणे आणि गरजू नागरिकांना राहण्यासाठी वापरल्या जातील. बिहारमधील रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मुंबईत उपचारासाठी येणाऱ्यांसाठी येथे २४० खाटांचे एक खास वसतिगृह बांधले जाईल. यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.






