पुणे : शासकीय कार्यालयातील अधिकायांच्या सहीला खूप महत्व असते. त्यामुळे कोणत्याही कागदपत्रावर सही करुन मंजुरी देताना त्या कागदावर वजन किती ठेवले आहे, हे पाहिले जात असल्याचा सामान्यांचा अनुभव आहे.
इंदापूर तहसील कार्यालयात (Indapur Tahsildar Office) तहसीलदार यांच्या सहीचे वजन २५ हजार रुपये असल्याचा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत दिसून आले.
जमिनीतून रस्ता करण्यासाठी परवानगी मिळावी, याच्या अंतिम आदेशावर तहसिलदार यांची सही घेण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच घेताना इंदापूर तहसील कार्यालयातील महसूल सहायक महिलेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. कावेरी विजय खाडे Kaveri Vijay Khade (वय ४८) असे अटक केलेल्या महसूल सहायक महिलेचे नाव आहे.
इंदापूर परिसरातील मौजे भांडगाव येथे तक्रारदारांच्या वडिलांची ३९ गुंठे जमीन आहे. जमिनीच्या परिसरात रस्ता तयार करण्यासाठी परवानागी मिळावी, असा अर्ज तक्रारदाराने इंदापूर तहसील कार्यालयात अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी झाली. अंतिम आदेशावर तहसीलदारांची सही घेण्यासाठी तहसील कार्यालयातील महसूल सहायक खाडे हिने तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केल्यावर कावेरी खाडे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी इंदापूर तहसील कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपये घेताना कावेरी खाडे हिला पकडण्यात आले.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रेम वाघमोरे तपास करत आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचार्याने लाच मागितल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (दूरध्वनी- ०२०-२६१२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३) तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.