वारजे पोलिसांची गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई – चार जणांवर एमपीडीए, तिघांवर मोक्कांतर्गत कारवाई
पुणे (प्रतिनिधी – मोईन चौधरी ) वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलली जात असून, गेल्या दीड महिन्यात चार गुन्हेगारांवर एमपीडीए (महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायदा) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांना एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून, आणखी तिघांविरुद्ध मोक्का (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई झाली आहे.
वारजे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस झिरो टॉलरन्स धोरण राबवत आहेत. त्याअंतर्गत अभिजित ऊर्फ चौक्या तुकाराम येळवंडे, ओंकार ऊर्फ टेड्या उमेश सातपुते, गौरव संजय शेळके आणि ओंकार ऊर्फ ढेण्या सुधाकर चौधरी यांच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच, रेकॉर्डवरील गुन्हेगार लक्ष्मण ऊर्फ भैय्या येडबा शेंडगे, रोहित वसंत पासलकर आणि आदित्य ऊर्फ बंडी गणेश मंडलीक यांच्याविरोधात मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.
अल्पवयीन गुन्हेगारालाही शिक्षा
विशेष म्हणजे, ओंकार ऊर्फ ढेण्या सुधाकर चौधरी याने अल्पवयीन असताना चार गुन्हे केले होते. १८ वर्षांचा झाल्यानंतरही त्याने वारंवार गुन्हेगारी कृत्ये केली. त्यामुळे त्याच्या विरोधात वारजे पोलिसांनी स्थानबद्धीचा प्रस्ताव तयार केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याला मंजुरी दिली असून, त्याला २२ फेब्रुवारी रोजी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
गुन्हेगारांना थेट तुरुंगात
वारजे पोलिसांनी लोणावळा, धायरी आणि रामनगर परिसरातून गुन्हेगारांना ताब्यात घेऊन नागपूर, नाशिक आणि बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध केले आहे. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे, पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, तसेच पोलीस अंमलदार बालाजी काटे, सागर कुंभार, योगेश वाघ, निखिल तांगडे, शरद पोळ, गोविंद कपाटे आणि अमित शेलार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
गुन्हेगारांसाठी ‘करेक्ट कार्यक्रम’ तयार
यापुढेही गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. “कोणताही गुन्हेगार कायदा हातात घेणार असेल, तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. काही गुन्हेगारांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला जाणार आहे,” असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे यांनी दिला. तसेच, नागरिकांनी निर्भयपणे व्यवहार करावेत, कोणी त्रास देत असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कारवाईत अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे यांचे सहकार्य लाभले.