- खराडी परिसरात दहशत माजवणारा गुन्हेगार जय गौरव गायकवाड (वय २०) याला पोलिसांनी तडीपार केले आहे. त्याच्यावर शरीराविरुद्धचे दोन गुन्हे दाखल होते. पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या आदेशानुसार त्याला पुणे शहर, पिंपरी चिंचवड व जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
खराडी परिसरात दहशत माजविणाऱ्या आणि शरीराविरुद्ध गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अखेर पोलिसांनी तडीपार करत त्याच्या गुन्हेगारीवर लगाम घातला आहे. जय गौरव गायकवाड (वय २०, रा. दिनकर पठारे वस्ती, खराडी) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
जय गायकवाड याच्यावर शरीराविरुद्धचे दोन गंभीर गुन्हे दाखल असून तो गेल्या काही काळात परिसरात नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करत होता. या पार्श्वभूमीवर खराडी पोलिसांनी त्याच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्याकडे सादर केला होता. जाधव यांनी प्रस्तावातील कागदपत्रांची बारकाईने तपासणी करून ४ एप्रिल २०२५ रोजी जय गायकवाड याला एक वर्षासाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून तडीपार करण्याचे आदेश जारी केले.
मात्र, आदेशानंतर तो गायब झाला होता. अखेर बुधवारी पोलिसांनी शोधमोहीम राबवत त्याला अटक केली आणि तडीपारीची कारवाई पूर्ण केली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण आणि सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार शिर्के आणि सांगळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.