गगन अदिरा सोसायटीतील बिअर शॉपीला NOC व शासकीय नियमांशिवाय दिलेला परवाना रद्द करा, अशी मागणी करत नागरिकांनी संदीप सातव यांच्या नेतृत्वाखाली केले आंदोलन . महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होणार!
वाघोली – गगन अदिरा सोसायटी परिसरात नियम धाब्यावर बसवून सुरू करण्यात आलेल्या ‘Booze Craving Beer And Wine Shop’ या बिअर शॉपीविरोधात परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. स्थानिक नागरिकांची कोणतीही मंजुरी (NOC) न घेता आणि शासकीय नियमांचे उल्लंघन करून दिलेला परवाना पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असा ठपका ठेवत आज जोरदार आंदोलन करण्यात आले.
या बिअर शॉपीमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, लहान मुलांचे मानसिक स्वास्थ्य व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी शॉपी त्वरित बंद करून परवाना रद्द करण्याची ठाम मागणी केली आहे.
भाजपा युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सातव यांच्या नेतृत्वाखाली गगन अदिरा, मॅजेस्टिक मेनहॅटन, पार्कलेन प्रीमियर, स्कायलाईट अशा अनेक सोसायट्यांतील नागरिकांनी एकत्र येत बिअर शॉपीसमोर आंदोलन छेडले. याआधी २३ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे हरकत नोंदवून निवेदनही सादर करण्यात आले होते. मात्र कारवाई न झाल्याने आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरला नाही, असं संतप्त नागरिकांनी सांगितलं.
प्रशासनाने तात्काळ परवाना रद्द करून योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.– भाजपा युवा मोर्चा, पुणे जिल्हा | संदीप सातव, जिल्हाध्यक्ष