Home » गुन्हा » हप्ता न दिल्याने पानटपरी चालकावर जीवघेणा हल्ला; लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल

हप्ता न दिल्याने पानटपरी चालकावर जीवघेणा हल्ला; लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल

Facebook
Twitter
WhatsApp
623 Views

“आमची गावात दहशत आहे, तू पण हप्ता दे” म्हणत चौघांनी पानटपरी चालकाला धमकावले; नकार दिल्यावर टपरीबाहेर ओढून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण.

“गावात आमची दहशत आहे, लोक दरमहा हप्ता देतात, तू पण पैसे दे” असा दम देत पिंपळे जगताप येथील एका पानटपरी चालकावर चार जणांनी एकत्रितपणे जीवघेणा हल्ला केला. लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात खुनाचा प्रयत्न, खंडणी, दमदाटी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना गुरुवारी रात्री 9.45 च्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोडवरील पिंपळे जगताप चौफुला परिसरात घडली. जखमी व्यावसायिकावर वाघोली येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
तक्रारदार हे ‘शिव दरबार पानटपरी’ व ‘एवन कलेक्शन’ नावाचे कपड्यांचे दुकान चालवतात. गुरुवारी रात्री पानटपरीवर बसले असताना पांढऱ्या रंगाची होंडा सिटी कार (क्रमांक MH-21…) त्यांच्या टपरीसमोर येऊन थांबली. या कारमधून नितीन उर्फ अण्णा राजेंद्र कुसेकर,सचिन राजेंद्र कुसेकर, रविंद्र उर्फ पांडा राजाराम जगताप (सर्व रा. पिंपळे जगताप, ता. शिरूर, जि. पुणे)व चौथा अनोळखी इसम खाली उतरले.चारही जणांनी पान मागितल्यानंतर तक्रारदाराने पैसे मागितले असता त्यांनी तिथेच दमदाटी सुरू केली. “तुला माहीत नाही का आम्ही कोण आहोत? गावात आमची दहशत आहे, दरमहा हप्ता दे” असे म्हणत त्यांनी दरमहा 2000 रुपयांची खंडणी मागितली. विरोध केल्याने नितीन कुसेकरने “घ्या याला बाहेर आणि दाखवा आपला हिसका” असे सांगून त्या चौघांनी तक्रारदाराला टपरीबाहेर खेचले.सचिन व रविंद्र यांनी तक्रारदाराला धरून ठेवले, तर नितीन व अनोळखी इसमाने हाताबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर नितीन कुसेकरने कारमधून लोखंडी रॉड काढून डोक्यावर, पाठीत व डाव्या बरगडीवर जबर मारहाण केली. गंभीर जखमी झाल्यामुळे तक्रारदार तेथेच कोसळले. मारहाणीनंतर आरोपी कारमध्ये बसून घटनास्थळावरून पसार झाले.जखमीस तत्काळ लाईफ लाईन हॉस्पिटल, वाघोली येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय उपचार घेत असताना त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार शिक्रापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भादंवि कलम 307 (खुनाचा प्रयत्न), 385 (खंडणी), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!