Home » ताज्या बातम्या » अरे बापरे! गणेगाव दुमाला येथे अवकाळी पाहुणे – दोन महाकाय रानगवे दाखल; गावकऱ्यांत भीतीचं वातावरण

अरे बापरे! गणेगाव दुमाला येथे अवकाळी पाहुणे – दोन महाकाय रानगवे दाखल; गावकऱ्यांत भीतीचं वातावरण

Facebook
Twitter
WhatsApp
341 Views

शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमालामध्ये दोन रानगवे शेतात फिरताना दिसले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून.याआधी बिबट्याच्या हालचालींमुळे ग्रामस्थ त्रस्त होते आणि आता गव्यांचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये अधिक चिंता निर्माण झाली आहे. वनविभाग या घटनेवर लक्ष ठेवून आहे.

शिरूर तालुक्यात यापूर्वी कधीही न पाहिलेलं दृश्य सोमवारी सकाळी पाहायला मिळाले. गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथील संगमेश्वर मंदिर परिसरात दोन प्रचंड रानगवे मॉर्निंग वॉक करताना प्रत्यक्ष पाहायला मिळाले. शेतकरी अभिषेक बोरावडे सकाळी ७ वाजता शेतात पाणी देण्यासाठी गेले असता, ही दोन रानगवे रस्ता ओलांडताना त्यांच्या नजरेस पडली.
हा थरारक प्रसंग काही युवकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या दृश्यामुळे गावकऱ्यांमध्ये एकीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात असलं, तरी दुसरीकडे भीतीचं सावट गडद झालं आहे. याआधी बिबट्याच्या वाढत्या हालचालींनी ग्रामस्थ आधीच त्रस्त होते आणि आता गव्यांचाही उगम झाल्याने नागरिक अधिकच चिंतेत आहेत.
व्हिडिओत दिसणारी ही गव्यांची जोडी पूर्ण वाढ झालेली असून त्यांचं वजन सुमारे ७०० किलोच्या आसपास असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. याआधीही काही दिवसांपूर्वी परिसरात गव्यांच्या अस्तित्वाच्या चर्चा होत्या, मात्र यावेळी प्रत्यक्ष पुरावा समोर आल्याने त्या चर्चा खरी ठरत आहेत.
पाण्याच्या शोधात रान सोडून गावात?
वनविभागाच्या प्राथमिक माहितीनुसार, उन्हाळ्यात पाण्याच्या शोधात अनेक वन्यप्राणी जंगलाबाहेर पडतात. गव्यांचा कळप या भागातून गेला असण्याची शक्यता असून हे दोन गवे वाट चुकून मागे राहिले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गावकऱ्यांना आवाहन:
वनविभागाने नागरिकांना घाबरून न जाता, संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. गव्यांना त्रास देऊ नये, डिवचू नये, आणि शक्यतो गटाने बाहेर पडावं, असे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या वनविभाग या गव्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असून ते कुठून आले आणि पुढे कुठे गेले याचा शोध घेण्यात येत आहे.
या अवचित भेटीमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून वनविभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!