82 Views
शिरुरात जबरदस्ती धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न उधळला!
टाकळी हाजी गावात ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला. सात जणांवर गुन्हा दाखल, तातडीने अटक.
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकारात सहभागी असलेल्या सात जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना तातडीने अटक करण्यात आली आहे.
टाकळी हाजी गावातील रहिवासी राहुल गायकवाड यांच्या घरी गावातील प्रशांत घोडे आणि अन्य सहकाऱ्यांनी अचानक भेट देत, “येशूची प्रार्थना केल्याने रोग बरे होतात”, “तुमच्या देवांचा काय उपयोग?” अशा शब्दांत हिंदू देवतांचा अवमान करत ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा आग्रह धरला. त्यांनी गायकवाड दाम्पत्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला.परिस्थितीची गांभीर्य ओळखून राहुल गायकवाड यांनी डायल 112 वर संपर्क केला. त्यानंतर पोलिस हवालदार शिवाजी बनकर व शिपाई शंकर बल्लाळ यांनी घटनास्थळी धाव घेत सातही आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणी राहुल गायकवाड यांच्या फिर्यादीवरून प्रशांत जालिंदर घोडे (पुणे), मोजस डेव्हीड, अमोल गायकवाड, योगेश रक्षंत, जेसी अँन्थोनी (सर्व नागपूर), कुणाल भावणे (भंडारा), व सिद्धांत कांबळे (पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उ.नि. दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
शिरुर पोलिसांच्या तत्परतेमुळे धार्मिक तणावाचे संकट टळले असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.