शिरूरच्या वीज वितरण कार्यालयात अज्ञात चोरट्याने मध्यरात्री थेट प्रवेश करत सीसीटीव्ही समोरच अल्युनियम कंडक्टर व १२० एमएम केबल असा ३२ हजारांचा माल केला लंपास. चोरी इतकी सफाईदार होती की सुरक्षेची व्यवस्था धुळीस मिळाली. पोलिस तपास सुरू असून चोरट्याचा थरार सीसीटीव्हीत कैद …
शिरूर (प्रतिनिधी) :
शहरातील शासकीय वीज वितरण कार्यालयात अज्ञात चोरट्याने अक्षरशः थेट प्रवेश करत ३२ हजारांचा सरकारी माल लंपास केल्याची थरारक घटना घडली आहे. ही चोरी कुठल्याही सिनेमा किंवा वेबसिरीजला शोभेल अशी असून, संपूर्ण यंत्रणेला झोपेत गाठत चोरट्याने सुरक्षा व्यवस्थेची अक्षरशः खिल्ली उडवली आहे.
ही घटना ४ मेच्या सायंकाळपासून ५ मेच्या पहाटेपर्यंतच्या वेळेत घडली. कार्यालय बंद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांनी लक्षात आणून दिलं की, बाहेर ठेवलेले अल्युनियम कंडक्टर व १२० एमएमची केबल गायब आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, २.३० च्या सुमारास एक अनोळखी इसम मोटारसायकलवरून गेटमधून आत येतो, सामान गाडीस बांधतो आणि कोणालाही जाणीव न होता पसार होतो – हा थरार पाहून कर्मचारीही हादरले.
चोरट्याच्या या धाडसी कृतीने संपूर्ण वीज विभागात खळबळ उडाली असून, कार्यालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एकीकडे दिवसाढवळ्या सरकारी मालावर डल्ला, तर दुसरीकडे अजूनही आरोपी अज्ञातच – हे प्रशासनासाठी स्पष्ट अपयशच मानलं जात आहे.
यामध्ये अल्युनियम कंडक्टर – ₹२८,००० (अंदाजे) व १२० एमएम केबल – ₹१२,००० (अंदाजे) असा एकूण ₹३२,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे
या प्रकरणी मानसिंग जगदीश नेवसे (वय ३५, रा. छत्रपती कॉलनी, शिरूर) यांनी फिर्याद दाखल केली असून, शिरूर पोलिसांनी गुन्हा क्र. ३०९/२०२५ नुसार BNS ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तपास पो.ह. खेडकर करत आहेत.
सरकारी कार्यालयात अशी निर्भय आणि नाट्यमय चोरी ही यंत्रणांतील ढिसाळपणाची जिवंत साक्ष आहे. आता चोर सापडतो की पोलिसांच्या हाती फक्त सीसीटीव्हीचा सावराच उरतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे!