वाघोलीत महावितरणचा ट्रान्सफॉर्मर गहाळ! ‘गेला की नेला गेला?’ – वर्ल्ड ऑफ जॉय, गेरा प्रॉपर्टीजमधील २०० केव्हीएचा डीपी अचानक गायब! फक्त एका ट्रान्सफॉर्मरची तक्रार, पण चर्चेत तीन – बाकीचे दोन कुठं? जबाबदार अधिकारी गप्प का?‘डीपी हरवला की सेटिंग झाली?’ – नागरिकांचा सवाल
वाघोली (प्रतिनिधी) – वाघोलीतील वर्ल्ड ऑफ जॉय, गेरा प्रॉपर्टीज येथील २०० केव्हीए क्षमतेचा महावितरणचा ट्रान्सफॉर्मर अचानकपणे गायब! – पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर खळबळ उडाली असून, आणखी दोन ट्रान्सफॉर्मरची अफरातफर झाल्याची चर्चा महावितरणच्या गोटात आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल नाही – यामुळेच नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण पसरले आहे.
महावितरणचे सहाय्यक अभियंता दीपक बाबर यांनी वाघोली पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, सदर डीपी (रोहित्र) नोव्हेंबर २०१९ मध्ये वीजपुरवठ्यासाठी बसवण्यात आले होते. डिसेंबर २०२० मध्ये गेरा प्रॉपर्टीजला एचटी कनेक्शन देण्यात आल्यानंतर जुने एलटी कनेक्शन बंद झाले. मात्र, बंद झालेल्या कनेक्शनचा ट्रान्सफॉर्मर नेमका गेला कुठे?
गहाळ ट्रान्सफॉर्मर कोणाच्या जबाबदारीचा?
विजेच्या लोडचा विचार करून दिलेल्या एचटी कनेक्शनसह जुन्या एलटी ट्रान्सफॉर्मरबाबत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्याने गोडाऊनमध्ये जमा करण्याची प्रक्रिया का केली नाही? आणि अशा निष्काळजीपणाबद्दल संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा का नाही? हा सवाल आता जोर धरतोय.
उर्वरित दोन ट्रान्सफॉर्मर कुठे गेले?
महावितरणच्या वाघोली विभागात एक नव्हे, तर तब्बल तीन ट्रान्सफॉर्मर गहाळ झाल्याची चर्चा आहे. पण पोलिसांत गुन्हा फक्त एकाचबाबत नोंदवला गेला आहे. उर्वरित दोन ट्रान्सफॉर्मरबाबत ‘गुप्तता’ का पाळली जातेय? यामागे कोणाचे आर्थिक हितसंबंध दडले आहेत का? याचीही नागरिकांत चर्चा रंगली आहे.
गुन्हा द्या, पण सर्वांवर!
फक्त एका घटनेची तक्रार करून उरलेल्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न महावितरणमधील कोणाच्या सांगण्यावरून केला जातोय का? ट्रान्सफॉर्मर चोरीला गेले म्हणजे ‘लोह’च नाही तर जबाबदाऱ्या आणि पारदर्शकतेची ‘हकालपट्टी’ झाली आहे, अशी टीका आता सर्वत्र ऐकू येतेय.