123 Views
शिरूरच्या शिंदोडी गावात शेतजमिनीतून बेकायदेशीर माती वाहतूक; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल. महसूल कर्मचाऱ्यांच्या सहभागाचा संशय, पोलिस तपास सुरू.
शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावात बेकायदेशीररीत्या शेतजमिनीतून मोठ्या प्रमाणावर माती काढून ती इतर जमिनीवर टाकल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकारात महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
फिर्याद विनायक लक्ष्मण फडके (वय ४२, व्यवसाय वकील, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी दिली असून अजीत ओव्हाळ, नंदू ओव्हाळ, तात्याभाऊ ओव्हाळ, कृष्णाबाई माने व राजेंद्र माने (रा. शिंदोडी, ता. शिरूर) यांचा विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गट क्र. २२३ मधून जेसीबी आणि हायवा ट्रकच्या सहाय्याने माती काढून ती गट क्र. ४०/१ व इतर ठिकाणी नेऊन टाकण्यात आली. यामुळे संबंधित जमिनीच्या नैसर्गिक रचनेला आणि पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.
फिर्यादी फडके यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, या बेकायदेशीर कृत्यास महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांची मूकसंमती वा दुर्लक्ष मिळाल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार टेंगले हे करत असून पोलीस प्रशासन या प्रकरणात अधिक तपास करत आहे.शिरूरच्या शिंदोडी गावात शेतजमिनीतून बेकायदेशीर माती वाहतूक; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल. महसूल कर्मचाऱ्यांच्या सहभागाचा संशय, पोलिस तपास सुरू.