कोझीकोडी, केरळ :
सोशालिस्ट पार्टीच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक २५, २६ व २७ एप्रिल २०२५ रोजी तीन दिवसांचे राष्ट्रीय समाजवादी विचार संमेलन कोझीकोडी येथे संपन्न झाले. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजवादी नेते अनंतकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाचे आयोजन समाजवादी नेते विजय राघवन यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
या संमेलनात देशभरातील १७ राज्यांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यावेळी वयोवृद्ध नेते वासू आणि बाणी पटनायक यांची विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरली.
संमेलनात प्रतिनिधींनी आपल्या-आपल्या राज्यातील महत्त्वाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय समस्या मांडल्या. महिला सक्षमीकरण, ग्लोबल वॉर्मिंग, डिजिटलायझेशन, पर्यावरण संरक्षण, बालकामगार निर्मूलन, कृषी कायदे व शेतकरी समस्या, आंतरराष्ट्रीय सीमेवरील तणाव, जागतिक आर्थिक घडामोडी, दहशतवाद, परराष्ट्र धोरण, तसेच अंतराळ संशोधन या विषयांवर सखोल चर्चा झाली.
या चर्चेच्या निष्कर्षातून ‘अखिल भारतीय समाजवादी कमिटी’ ची स्थापना करण्यात आली असून, ही समिती समाजवादी विचारांचा प्रचार-प्रसार करेल व देशभरात अभ्यासात्मक चळवळ उभी करेल, असा ठराव एकमताने पारित करण्यात आला.
या समितीसाठी पुणे जिल्ह्यातून दत्ताभाऊ पाकिरे आणि साधना ताई शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
संमेलनासाठी समाजवादी पार्टी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सदस्य मा. विनायक लांबे, तसेच अश्विनी ताई सातव-डोके, संदेश दिवेकर आणि शुभम दिवेकर यांनी उपस्थिती लावली.