वाघोलीतील महावितरण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. भावडी रोडवरील ट्रान्सफॉर्मर पाच-सहा दिवसांपासून जळालेला असून, नागरिक अंधारात आहेत. सेवा हमीनुसार २४–४८ तासांत दुरुस्ती अपेक्षित असतानाही काम प्रलंबित आहे. महावितरणच्या कारभारात ट्रान्सफॉर्मर चोरी, डीपी बॉक्सची धोकादायक स्थिती, माहिती लपवणे अशी अनेक प्रकरणं समोर आली असून, नियम शिकवणारे अधिकारी स्वतःच नियम पाळताना दिसत नाहीत. नागरिकांमध्ये नाराजी असून, नुकसान भरपाईच्या हक्काचीही चर्चा सुरू आहे.
वाघोलीतील महावितरण विभाग सध्या ‘कारभार नव्हे, कारनामे’ अशा ओळखीने ओळखला जात आहे. रोज नवनवीन त्रुटी आणि दुर्लक्षाचे प्रकरणे समोर येत असताना नागरिकांच्या संयमाचा अंत पाहिला जात आहे. नियमांचे धडे देणारेच अधिकारी आता नियम पायदळी तुडवत असल्याचे चित्र आहे. वीजपुरवठ्यासारख्या मूलभूत सेवेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्टपणे जाणवते.
ट्रान्सफॉर्मर जळला, अंधार मात्र जनतेच्या माथी!
भावडी रोडवरील ‘चार नंबर’ परिसरात ट्रान्सफॉर्मर गेल्या पाच-सहा दिवसांपासून जळालेला आहे. महावितरणच्या सेवा हमीनुसार शहरी भागात २४ तासांत, ग्रामीण भागात ४८ तासांत दुरुस्ती किंवा बदल अपेक्षित असतो. मात्र येथे चार-पाच दिवस उलटूनही नागरिक अंधारातच आहेत.
“हे केवळ निष्काळजीपणं की ठरवून केलेलं दुर्लक्ष?” असा सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.
नुकसान भरपाईचा हक्क – पण फक्त कागदावर?
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या सेवा हमीनुसार, वेळेत सेवा न दिल्यास ग्राहकांना नुकसान भरपाई मिळण्याचा कायदेशीर हक्क आहे. पण वाघोलीतील सामान्य नागरिक हा हक्क प्रत्यक्षात कसा मिळवणार? हाच मोठा प्रश्न बनला आहे.
महावितरणचे ‘सिलसिलेवार’ कारनामे:
ट्रान्सफॉर्मर चोरी
माहिती लपवण्याची गुप्तता
रस्त्यावर पडलेले डीपी बॉक्स
आणि आता, जळालेला ट्रान्सफॉर्मर दुरुस्त न करण्याची ढिसाळ वृत्ती
ही सगळी प्रकरणं म्हणजे यंत्रणेतील निष्क्रियतेचा, बेजबाबदारपणाचा आणि पारदर्शकतेच्या अभावाचा आरसा ठरत आहेत.
नियम सर्वांसाठी, की फक्त निवडकांसाठीच?
सर्वसामान्य नागरिकांना नियमांचे काटेकोर पालन सांगणारेच अधिकारी, इतरांसाठी मात्र ‘माफक शिथिलता’ दाखवतात, अशी नागरिकांची भावना आहे. यामुळे यंत्रणेवरील विश्वास दिवसेंदिवस ढासळत चालला आहे
महावितरणचा हेतू प्रकाश देण्याचा आहे की अंधार पसरवण्याचा?
नागरिक आता म्हणतात – “वीज बिल वेळेवर हवं, पण सेवा? ती येईल हवामानावर अवलंबून!”