Home » गुन्हा » वतन जमिनीत बेकायदेशीर प्लॉटिंगचा प्रकार उघड – महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने नागरिकांची फसवणूक

वतन जमिनीत बेकायदेशीर प्लॉटिंगचा प्रकार उघड – महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने नागरिकांची फसवणूक

Facebook
Twitter
WhatsApp
157 Views

वतन जमिनीत बेकायदेशीर प्लॉटिंगचा प्रकार उघड – महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने नागरिकांची फसवणूक

शिरूर (प्रतिनिधी ) : शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील  वतन इनाम वर्ग 2 (ब) प्रकारातील जमिनीत शासकीय परवानगीशिवाय बेकायदेशीर प्लॉटिंग करून, गुंठेवारी पद्धतीने जमिनीच्या विक्रीचा धंदा सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. स्थानिक पातळीवरील भू-माफियांकडून कायद्याचे उल्लंघन करून सातबाऱ्यावर बोगस नोंदी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

 

सदर जमीन ही वतन इनाम प्रकारातील असून ती केवळ शेती उपयोगासाठी आरक्षित आहे. अशा जमिनीचा शेतीव्यतिरिक्त वापर करण्यासाठी 50 टक्के नजराणा भरून शासकीय परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, या प्रकरणात कोणतीही परवानगी घेतलेली नसून, महसूल यंत्रणेला हाताशी धरून सरळपणे शेतजमिनीचे तुकडे करून त्यांची खरेदी-विक्री सुरू आहे.

 

सदर जमिनीचे सातबारा उतारे, फेरफार नोंदी यामध्ये बेकायदेशीर बदल करून नागरिकांना प्लॉट विकण्याचे प्रकार सुरू आहेत. यात गुंतवणूकदारांना विकास होईल, सरकारी मंजुरी आहे, असे खोटे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली जात आहे. तसेच, हस्तांतरणावर बंदी असतानाही अशा जमिनींचा व्यवहार सुरू असल्याने कायद्याची सरळ सरळ पायमल्ली होत आहे.

 

या प्रकारासंदर्भात निळा वादळ संस्थेच्या अध्यक्षा दीपिका भालेराव यांनी तहसीलदार शिरूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित गट क्रमांकाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. शेतकरी, वतनधारक आणि सामान्य गुंतवणूकदार यांच्यावर अन्याय करणाऱ्या या प्रकारात, संबंधित जमिनीवर शर्तभंगाची कारवाई करून ती सरकारजमा करण्यात यावी, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली आहे.

 

या प्रकारामुळे महसूल यंत्रणेतील काही कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशाराही स्थानिकांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!