FIR मध्ये ‘अनोळखी’, आरोपी ओळखीचा! वाघोली पोलिसांची उर्मट वागणूक; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे थेट तक्रार
पुणे (प्रतिनिधी) – वाघोली पोलीस स्टेशन हद्दीतील केसनंद गावात ९ जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेला युवक आजही कोमात झुंज देतो आहे. विशेष म्हणजे, या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे असूनही, आरोपीचा उल्लेख ‘अनोळखी’ असा करण्यात आला. या धक्कादायक निष्काळजीपणावर शिवसेना हवेली तालुक्याचे पदाधिकारी संतप्त झाले असून, त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
शिवसेना हवेली तालुकाप्रमुख विपुल हनुमंत शितोळे यांनी संबंधित पोलीस अंमलदार गोंगे यांच्यावर तत्काळ निलंबनाची मागणी केली आहे. “अपघाताचे फुटेज असूनही तक्रार नोंदवण्यात टाळाटाळ झाली. पोलिसांनी वारंवार फोन करणाऱ्या कुटुंबियांना आणि स्थानिकांना धमकावलं. उलट ‘सरकारी कामात अडथळा’ या कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली,” असा गंभीर आरोप शितोळे यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “जर लोकप्रतिनिधींनाही पोलिसांकडून धमक्या दिल्या जात असतील, तर सामान्य जनतेच्या सुरक्षेचा काय भरोसा?” याशिवाय त्यांनी असा संशयही व्यक्त केला की पोलिसांचा आरोपीशी काही आर्थिक संबंध असू शकतो, त्यामुळेच एफआयआरमध्ये नाव टाळण्यात आलं असावं.
शितोळे यांनी हेही सांगितले की, “या अंमलदाराविरोधात याआधीही शेजारील गावांमधून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या घटनेचा सखोल तपास करून कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, ही आमची ठाम मागणी आहे.”
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या वर्तणुकीवर, पारदर्शकतेवर आणि न्याय मिळवण्याच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.