तडीपार आरोपीला गुन्हे शाखा युनिट-३ ने केली अटक; सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात सुपूर्द
पुणे : शहरात गंभीर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने पोलीस वरिष्ठांच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत, गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तडीपार आदेश झुगारून फिरणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. गणेश दिलीप म्हसकर (रा. रामनगर, माणिकबाग, सिंहगड रोड, पुणे) असे अटक केलेल्या तडीपाराचे नाव असून, त्याच्यावर पूर्वी अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दि. २१ जुलै २०२५ रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातर्फे तडीपार, मोक्का व फरार गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-३ मधील सपोफौ शिंदे, पो.ह. कैलास लिम्हण, पो.ह. अमोल काटकर, पो.ह. किशोर शिंदे, पो.शि. योगेश झेंडे आणि पो.शि. तुषार किंद्रे हे सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्यामध्ये नमूद आरोपी गणेश म्हसकर हा पुणे शहरात परत आला असून, तो नियमितपणे आपली पत्नी कामावर सोडण्यासाठी संतोष हॉल, सिंहगड रोड या भागात येत असल्याचे सांगण्यात आले. यावरून पथकाने तात्काळ संतोष हॉल चौक येथे धाव घेतली आणि वर्णनानुसार तपास करत आरोपीला तेथेच ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास कोथरूड येथील गुन्हे शाखा युनिट-३ च्या कार्यालयात आणून पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे यांच्या समोर सादर करण्यात आले. त्याच्याकडे विचारणा केली असता तो कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय पुणे शहरात परत आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यानंतर आरोपी गणेश म्हसकर यास पुढील कार्यवाहीसाठी सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त गुन्हे शाखा निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१ राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे सहा. पोलीस फौजदार पंढरीनाथ शिंदे, पो. हवालदार अमोल काटकर, कैलास लिम्हण, किशोर शिंदे, पो.शि योगेश झेंडे, तुषार किंद्रे यांनी कामगिरी केली आहे