पुण्यात अतिक्रमणांवर कारवाई केवळ ‘नावाला’? अतिक्रमण कारवाईनंतर रस्ते पुन्हा गजबजले
पुणे ( प्रतिनिधी )
: पुणे महानगरपालिकेने गेल्या महिन्यात शहराच्या विविध भागांत अतिक्रमणांवर मोठी कारवाई केली होती. मात्र, कारवाई पथक परतताच अतिक्रमणे पुन्हा जैसे थे होत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
विशेषतः फर्ग्युसन रस्ता, पेठा आणि सारसबागेजवळील खाऊ गल्लीत कारवाई पथक गेल्यानंतर लगेचच पुन्हा दुकाने थाटल्याचे दिसून येत आहे. शहरातील पदपथ आणि रस्ते अतिक्रमणांनी व्यापले असून, नागरिकांना चालणेही कठीण झाले आहे. आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानंतर सुरू झालेली ही मोहीम अपेक्षेप्रमाणे परिणामकारक ठरत नसल्याचे चित्र आहे.
पथक येण्यापूर्वीच ते आपले साहित्य हटवतात, तर पथक जाताच पुन्हा व्यवसाय सुरू करतात, कारण अनेक व्यावसायिकांना कारवाईची ‘टीप’ मिळते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. काही अतिक्रमण निरीक्षक आर्थिक व्यवहारामुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संशयही नागरिक व्यक्त करत आहे.
सारसबागजवळील खाऊ गल्ली आणि फर्ग्युसन रस्ता, जिथे काही आठवड्यांपूर्वी मोठी कारवाई झाली होती, तिथेही पुन्हा अतिक्रमणे वाढली आहेत. दरम्यान, फर्ग्युसन रस्त्यावर कायमस्वरूपी पथक तैनात केले जाईल आणि तीन वेळा नोटीस देऊनही अतिक्रमण करणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव पथविक्रेता समितीसमोर ठेवला जाईल, कायद्यानुसार दंड भरून जप्त केलेला माल घेता येतो, ज्यामुळे पुन्हा अतिक्रमकरून व्यवसाय सुरु करतात, असे अतिक्रमण विभागप्रमुख संदीप खलाटे यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले.