शौक म्हणून पिस्तुल बाळगणारे गुंठा मंत्री गजाआड; मोबाईलमधील फोटोवरुन खंडणी विरोधी पथकाची कात्रज भागात कारवाई
सार्वभौम न्युज समूह
पुणे : शौक म्हणून पिस्तुल बाळगणाऱ्या दोघा गुंठा मंत्री असलेल्या तरुणांना खंडणी विरोधी पथकाने पकडले असून त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल, २ जिवंत काडतुस, ओला दुचाकी, मोबाईल असा २ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
शुभम राजेंद्र बेलदरे Shubham Rajendra Beldare (वय २९, रा. राजमुद्रा निवास, दत्तनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव), आणि मयुर ज्ञानोबा मोहोळ Mayur Dyanoba Mohol (वय २३, रा. अभिरुची परिसर, धायरी – नन्हे रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस अंमलदार मयुर राजेंद्र भोकरे यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, हवालदार रणिजत फडतरे, रहिम शेख, विजय कांबळे, दुर्योधन गुरव, पोलीस अंमलदार मयुर भोकरे, नितीन बोराटे अवैद्य धंद्यांवर कारवाई करण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार मयुर भोकरे, हवालदार रहिम शेख यांना मयुर मोहोळ याच्याकडे पिस्तुल असून तो ते जवळ बाळगून फिरत असल्याची बातमीदारामार्फत बातमी मिळाली. या बातमीवरुन पोलीस त्याचा शोध घेत असताना आंबेगाव येथील दुगा रेस्टॉरंटजवळ मयुर मोहोळला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पिस्तुल मिळाले नाही. त्याला विश्वासात घेऊन चौकशी करत असताना त्याच्याकडील मोबाईलची पाहणी केली. त्यात त्याचा पिस्तुलासह फोटो आढळून आला. तो फोटो दाखवून चौकशी केल्यावर त्याने हे पिस्तुल शुभम बेलदरे याच्याकडे ठेवायला दिल्याचे सांगितले. त्याच्या माहितीवरुन पोलीस शुभम बेलदरे याचा शोध घेत असताना तो साई लेक व्ह्यु सोसायटीच्या बाजूला जांभुळवाडी तळ्याच्या काठावरील कट्ट्यावर ओला गाडीसह थांबलेला दिसला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. सुरुवातीला त्याने नकार दिला. त्यानंतर फोटो दाखविल्यावर त्याने हे पिस्टल ओला गाडीच्या डिकीमध्ये असल्याचे सांगितले. पोलिसांनी डिकीतून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त केली. पोलिसांनी पिस्टलसह ओला गाडी व मोबाईल असा २ लाख ४० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक कळमकर तपास करीत आहेत