उसन्या पैशाच्या किरकोळ कारणावरून हॉटेलमधील वेटरने हॉटेल चालकाचा खून केला
सार्वभौम न्युज समूह
पुणे (प्रतिनिधी ) : ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास कोंढवे धावडे परिसरातील पीकॉक फॅमिली गार्डन, बार ॲण्ड लॉजिंग येथे घडली. संतोष सुंदर शेट्टी (वय ४५) असे खून झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आह, तर वेटर उमेश दिलीप गिरी (वय ३९, रा. कात्रज) याला कोंढवे-धावडे पोलिसांनी खूनप्रकरणी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, संतोष शेट्टी यांनी कोंढवे धावडे येथील हॉटेल पीकॉक हे चालविण्यासाठी घेतले होते. २५ दिवसांपूर्वी उमेश गिरी हा त्यांच्याकडे वेटरच्या कामासाठी आला होता. तेंव्हा पासून तो हॉटेलमध्ये वेटरचे काम करत होता. काम सुरु केल्यापासून दर चार-पाच दिवसांनी तो शेट्टी यांना उधारीवर पैसे मागत होता.
पहिल्या दोन वेळा शेट्टी यांनी त्याला पैसे दिले परंतु वारंवार त्याने पैसे मागायला सुरवात केली, त्यामुळे शेट्टी यांनी त्याला आधी काम चांगले कर मगच पैसे देईल असे सांगितले आणि पैसे देण्याचे टाळले. त्यामुळे उमेशला शेट्टी यांचा राग आला होता. त्यातून चार दिवसांपूर्वी त्यांची किरकोळ भांडणेही झाली होती. आज रात्री आठच्या सुमारास शेट्टी हॉटेलमध्ये बसले होते. त्यानंतर पुन्हा उमेशने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली, शेट्टी यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे उमेश आणि संतोष यांच्यात किरकोळ वादावादी झाली. त्यानंतर उमेश शांतपणे किचनच्या दिशेने गेला. किचनमधील चाकू घेऊन शांतपणे संतोष यांच्या मागून त्यांच्याजवळ आला. संतोष बेसावध असताना पाठीमागून त्यांच्या मानेत त्याने चाकू खुपसला. त्यामुळे संतोष हे क्षणात खाली कोसळले. त्यांच्या गळ्यातून रक्ताच्या धारा वहायला लागल्या. हॉटेलमधील इतर कर्मचारी व ग्राहकांनी संतोष यांना तातडीने माई मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.