Home » ब्लॉग » गणवेशातले हात बनले देवदूत – बेशुद्ध चालकाला दिले नवे जीवन

गणवेशातले हात बनले देवदूत – बेशुद्ध चालकाला दिले नवे जीवन

Facebook
Twitter
WhatsApp
425 Views

लोणीकंद:( शुक्रवार दि.२९)  रस्त्यावर नियम पाळायला लावणे हाच पोलीसांचा धर्म नाही, तर संकटसमयी जीव वाचवणे हीच खरी माणुसकी आहे, याचे जिवंत उदाहरण पुणे अहिल्यानगर महामार्गावरील लोणीकंद येथील तुळापूर फाट्यावर घडले. भर पावसात वाहतूक पोलीसांनी दाखवलेली तत्परता आणि धाडसामुळे एका बेशुद्ध चालकाचा जीव वाचला.

मुसळधार पावसाने महामार्ग अक्षरशः धुवून काढला होता. दृश्यमानता कमी असूनही वाहतूक नियोजनात मग्न असलेले पोलीस हवालदार जितेंद्र पवार तसेच महिला पोलीस शिपाई आशा वाळके आणि सुनीता पोळ आपले कर्तव्य पार पाडत होते. त्यावेळी अचानक नगर लेनवर (MH 12 PC 2374) ही स्विफ्ट कार मधोमध थांबली.

पोलिसांनी वाहनचालकाला पुढे जाण्याचा इशारा केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने शंका आली. तत्काळ गाडीकडे धावत जाऊन पाहणी केली असता, कारमध्ये अंदाजे ५० वर्षीय पुरुष चालक बेशुद्धावस्थेत आढळला. क्षणाचाही विलंब न करता, थेंबथेंब भिजलेल्या गणवेशात पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्याला गाडीतून बाहेर काढले. मुसळधार पावसाचा विचार न करता ओल्या रस्त्यावर उभे राहून त्यांनी त्याला सुरक्षित स्थळी आणले आणि तातडीने ससून रुग्णालयात हलवले. लायसन्सवरील तपशिलानुसार त्याचे नाव सुधाकर पडवळ असून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे.

या प्रसंगानंतर नागरिक भारावून गेले. भर पावसात जीव धोक्यात घालून केलेले हे काम पोलिसांच्या माणुसकीची खरी ओळख आहे. कायद्याच्या जोडीने माणुसकीची जाण ठेवणारे पोलीस हेच खऱ्या अर्थाने जनतेचे खरे रक्षक आहेत,अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तुळापूर फाट्यावर घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, गणवेशातले हात केवळ कायद्याचे रक्षक नाहीत, तर गरज पडल्यास देवदूतही ठरतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!