सणसवाडी परिसरात गुरुवार दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी ९ व्या दिवसाच्या गणेश विसर्जन मिरवणुका सुरू असताना शिक्रापूर पोलिसांनी विनापरवाना डॉल्बी साऊंडसह लावून मिरवणुक काढल्या प्रकरणी मंडळाच्या अध्यक्षासह डीजे मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सणसवाडी येथील सराटेवस्तीमध्ये गुरूदत्त तरुण गणेशोत्सव मंडळाने डॉल्बी साऊंड लावून विनापरवाना मिरवणूक काढत सार्वजनिक उपद्रव केल्याने पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. या प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष सागर दिलीप हरगुडे (२८, रा. सराटेवस्ती, सणसवाडी) आणि डॉल्बी सिस्टीमचा मालक महेश अनिल गुंडगळ (२५, रा. भोसे, ता. खेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार एस. ए. कारंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार आर. डी. मळेकर अधिक तपास करीत आहेत. डॉल्बी सिस्टीमची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलिसांनी केली आहे.