Home » ताज्या बातम्या » आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत  वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

Facebook
Twitter
WhatsApp
300 Views

आमदार, खासदार आदी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत  वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

 

सार्वभौम न्युज समूह

 

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : “चला झाडे लावूया, गावाला सुंदर बनवूया” या उपक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधील भोजदरी या  गावातील तरुणांनी एकत्र येत श्रमदानाच्या माध्यमातून हजारो नारळाची झाडे लावून संगमनेर तालुक्याच्या पठारभागामध्ये श्रमदानाच्या माध्यमातून वृक्षारोपण करून एक आगळा वेगळा उपक्रम केला.

अलीकडील काही वर्षांमध्ये पावसाच्या प्रमाणामध्ये होत असलेला अनियमितपणामुळे आणि उन्हाळ्यातील मार्च ते जून या महिन्यांदरम्यान गावाला पाणीटंचाई होत असल्याकारणाने या पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी “चला झाडे लावूया, गावाला सुंदर बनवूया” या उपक्रमांतर्गत संगमनेर तालुक्यातील भोजदरी गावातील तरुणांनी एकत्र येत वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम राबवला. या उपक्रमाला गावाबाहेरील  नोकरी निमित्ताने गेलेल्या  मुंबई, ठाणे, पुणे, नगर, नाशिक, संगमनेरकर आणि  भोजदरीकर ग्रामस्थांनी श्रमदानाच्या माध्यमातून दहा ते पंधरा फूट उंचीची शेकडो झाडे लावून पठार भागामध्ये एक वेगळा उपक्रम केला.

“नारळ आणि सागाच्या झाडांची लागवड ज्या भागात होते त्या भागामध्ये पाऊस जास्त पडतो हे आता अलीकडील काही संशोधनातून सिद्ध झालेल आहे” आणि म्हणूनच या वृक्षांची लागवड करून या गावातील तरुणांनी एकत्र येत हा उपक्रम राबवल्याचे या उपक्रमाचे समन्वयक प्रा.भाऊसाहेब घोडके यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी संगमनेर तालुका विधानसभेचे आमदार श्री अमोलजी खताळ यांच्या प्रतिनिधी म्हणून नीलमताई खताळ ह्या देखील उपस्थित होत्या. पठार भागामध्ये अशा प्रकारचे वेगळे उपक्रम होत आहेत याचे कौतुक त्यांनी केले तसेच निसर्ग विविधतेने नटलेल्या भोजदरी  गावाला आपण पर्यटनासाठी येण्यासाठी  लोकांना  आवाहन करणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले.या कार्यक्रमासाठी अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे हे देखील उपस्थित होते. श्रमदानाच्या माध्यमातून होत असणाऱ्या या उपक्रमांना शुभेच्छा देतानाच तरुणांनी निसर्ग संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचा कौतुक त्यांनी केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी भोजदरी या  गावामध्ये  तरुण करत असलेल्या कामाचे कौतुक करत असतानाच आपण स्वतः देखील या गावातील विहिरदरा येथील काळभैरवनाथ महाराजांच्या मंदिरासाठी पर्यटन स्थळ म्हणून लवकरच दर्जा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या तीनही लोकप्रतिनिधींच्या हस्ते वृक्षारोपण करून गावातील भोजादेवी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव मते यांनी ग्रामविकासासाठी विविध मागण्यांची निवेदने उपस्थित लोकप्रतिनिधींकडे सुपूर्द केली.

श्रमदानाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाला सेंट व्हिन्सेंट महाविद्यालय पुणे, बाळासाहेब जाधव महाविद्यालय आळे, सीताई महाविद्यालय घारगाव, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय ओतूर या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी तसेच या महाविद्यालयातील प्राचार्यांसह प्राध्यापकांनी देखील सहभाग नोंदवला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि संगमनेर पठारभागातील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन आहेर हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

    भोजदरीतील तरुणांच्या कामाची प्रेरणा घेऊन परिसरातील आजूबाजूच्या गावांमधील तरुण देखील असाच उपक्रम त्यांच्या गावामध्ये राबवण्यासाठीचे प्रयत्न करतानाचे चित्र आता दिसत आहे. त्यामुळे भोजदरीतील तरुणांचे आणि ग्रामस्थांचे कौतुक आजूबाजूच्या परिसरात होताना दिसत आहे. ग्रामस्थांच्या वर्गणीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमासाठी पाणलोट विकास कार्यक्रम, भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखाना संगमनेर यांचे विशेष अर्थसहाय्य लाभले.

        या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रा.भाऊसाहेब घोडके, प्रा. योगेश मते, संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे पाणलोट विकास कार्यक्रमाचे बाळासाहेब फापाळे, वृक्षमित्र एकनाथ डोंगरे, जालिंदर मते, भास्कर भारती, विकास हांडे, जगदीश हांडे  ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष ज्ञानदेव मते, उपाध्यक्ष मारुती डोंगरे, प्रकाश डोंगरे, सरपंच शिल्पाताई पोखरकर, मुख्याध्यापक डॉ.सोमनाथ बोंतले, आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!