लोकअदालत मध्ये दंडाच्या रकमेत वाहनचालकांना सवलत मिळणार आहे
सार्वभौम न्युज समूह
पुणे (प्रतिनिधी ) : विना हेल्मेट, सीटबेल्ट न लावता वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, विना नंबरप्लेट गाडी चालविणे यांसह अनेक प्रकारच्या वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी आकारण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत वाहनचालकांना सवलत मिळणार आहे.
प्रलंबित दंड जास्तीत जास्त सवलतीने भरण्याची संधी पुणेकरांना बुधवारपासून (ता. १०) शनिवारपर्यंत (ता. १३) होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीत मिळणार आहे.
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने या लोकअदालतीत वाहतूक नियमभंगांच्या दंडांमध्ये तडजोडीने जास्तीत जास्त सवलत दिली जाणार आहे. १० ते १३ सप्टेंबर दरम्यान येरवडा पोस्ट ऑफिसशेजारी वाहतूक शाखेच्या कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत प्रलंबित दंड सवलतीच्या दरात भरून पुणेकरांना थकबाकीमुक्त होता येणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिली.
दावा तडजोडीतून निकाली निघणार
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पुण्यातील सर्व न्यायालयांमध्ये १३ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रमुख जिल्हा न्यायाधीश व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र महाजन, सचिव न्यायाधीश सोनल पाटील, मोटार वाहन न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. पाटील, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, वाहतूक शाखा यांच्या पुढाकारातून यंदाच्या लोकअदालतीत वाहतूक नियमभंगांसाठी आकारलेल्या दंडात्मक ई-चलनाचे दावे तडजोडीतून निकाली काढण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या दंडात मिळणार सवलत
विनाहेल्मेट दुचाकी चालविणे
सीट बेल्ट न लावता चारचाकी चालविणे
सिग्नल तोडणे
वेगमर्यादा ओलांडणे
चुकीचे पार्किंग
वाहन चालविताना मोबाइलचा वापर
विनापरवाना, विना पीयूसी वाहन चालविणे
फिटनेस प्रमाणपत्र नसणे
चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे
नंबरप्लेट नसणे
या दंडात नाही सवलत
मद्यपान करून वाहन चालविणे
अपघात करून पळ काढणे
निष्काळजीपणे वाहन चालवून प्राणांतिक अपघातास कारणीभूत होणे
अल्पवयीन मुलाने वाहन चालविणे
अनधिकृत शर्यत
गुन्ह्यांसाठी वाहनांचा वापर
न्यायालयात सुनावणी प्रलंबित असलेली प्रकरणे
अन्य राज्यातील वाहतूक नियमभंगांची चलने
राष्ट्रीय लोकअदालतीत नागरिकांना वाहतूक चलनांचा प्रलंबित दंड सुलभपणे भरून कायदेशीरपणे थकबाकीमुक्त होता येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा.
– महेंद्र महाजन, प्रमुख जिल्हा न्यायाधीश पुणे
या उपक्रमातून नागरिकांना जास्तीत जास्त सवलतीत दंड भरून वाहतूक नियमभंगांची चलने तडजोडीने निकाली काढता येतील; तसेच वाहतूक शिस्तीबाबत जनजागृतीही होईल.
– सोनल पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण