काश्मीर मधील हजरतबल दरगाह . . .
सार्वभौम न्युज समूह
काश्मीर मधील हजरतबल दरगाहचे नूतनीकरण झाले. हे नूतनीकरण जम्मू काश्मीर वक्फ बोर्डाच्या माध्यमातून झाले. नूतनीकरण झाल्यानंतर बोर्डचे उद्घाटन झाले. बोर्डावर अशोकस्तंभाचे चित्र आहे यावर आक्षेप घेण्यात आला. आणि चक्क दगडाने घाव घालून बोर्डावरील अशोकस्तंभाचे चित्र तोडण्यात आले. हे चित्र तोडताना धर्मांधांचा आनंद गगनात मावत नसल्याचे दिसत होते. जणू काही खुप मोठा विजय त्यांनी मिळवला असे ते दाखवत होते. ते सर्व पाहून वाईट वाटले आणि रागही आला.
खरे पाहता आपल्या धार्मिक स्थळाच्या बाहेर राष्ट्रीय चिन्ह अशोकस्तंभ लागलेले आहे ही खरेतर अभिमान बाळगण्याची बाब आहे. आणि ही गोष्ट सर्व ठिकाणी मिरवण्याची बाब असताना याला बूत परस्ती (मूर्तिपूजा), शिर्क (एका ईश्वराला सोडून दुसऱ्याला पूजने) या चष्म्यातून पाहणे अतिशय संकुचित बुद्धीचे लक्षण आहे. या सर्व गोष्टी इस्लामच्या नावावर होतात, ही त्याहून अधिक लाजिरवाणी बाब.
अशोकस्तंभ उद्घाटनाच्या पाटीवर लावल्याने त्याला कोणी पूजले का ? त्याला कोणी देव मानले का ? अशोक स्तंभ प्रत्येक भारतीयाची अस्मिता आहे. जी आपल्याला रुपयाच्या नाण्यापासून ते पाचशेच्या नोटेपर्यंत दिसून येते. शुक्रवारच्या नमाज मध्ये चंदा गोळा करणाऱ्या डब्यात आणि रुमालात जे चिल्लर आणि नोटा पडतात त्यातील बऱ्याच चिल्लर आणि नोटांवर अशोकस्तंभ असते. आता हे चिल्लर आणि नोटा धर्मांध मुस्लिम तोडणार की जाळणार ? याचा विचार त्यांनीच करावा. मौलानाच्या हातात पाचशेची नोट टेकवताना त्यावर अशोकस्तंभ आणि महात्मा गांधी दोन्हीही असतात त्यावेळी ती घेताना मौलानाकडून शिर्क होत नाही का ? हा प्रश्न काश्मीर मधील मुस्लिमांनी त्यांना देशद्रोही कृत्य करण्यास प्रवृत्त करणाऱ्या इमाम, मौलाना यांना विचारायला हवा.


हज यात्रेला गेल्यावर जे भारतीय पासपोर्ट घेऊन तुम्ही ज्या काबा गृहाला प्रदक्षिणा घालता त्या पासपोर्ट वर देखील अभिमानाने अशोकस्तंभ लावलेला असतो. याला तुम्ही काय म्हणणार ? बुत परस्ती की शिर्क ? मला वाटतं तुमच्या संकल्पना तुम्ही नीटपणे स्पष्ट करून घ्यायला हव्यात. धर्माचा आधार घेऊन तुम्हाला मूर्खात काढने सर्वात सोपे होऊन बसले आहे. कोणीही उठतय आणि कशालाही शिर्क म्हणतंय. कोणीही उठतय आणि कशालाही बुत परस्ती म्हणतंय. इस्लामिक विचार एवढा हलका नाही की एका उद्घाटनाच्या पाटीवर अशोकस्तंभ आल्याने लगेच अल्लाह नाराज होईल. याने आपण इस्लामला बदनाम करत आहातच सोबतच सर्व मुस्लिमांना वारंवार आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहात ज्यांचा याच्याशी काहीही संबंध नसतो.
अशोकस्तंभ हे राष्ट्रीय प्रतिक आहे. त्याची विटंबना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. विटंबना करणाऱ्या देशद्रोह्यांना तालिबान मध्ये सोडून द्यावे. त्याशिवाय त्यांना भारताची किंमत समजणार नाही. दोन गोळ्या ढुंगणावर पडल्या की त्यांच्या तोंडून आपोआप ‘मेरा भारत महान’ निघेल. धर्मांधांविषयी भावनिक होण्याची आवश्यकता नाही. ते माणूस म्हणवण्याच्या लायकीचे नसतात.

– पैगंबर शेख
पुणे, महाराष्ट्र
९९७००७०७०५
#JammuAndKashmir #ashokstambh #SatyamevaJayate #nationalemblem






