एलिझाबेथकालीन प्रसिद्ध नाटककार रॉबर्ट ग्रीन याने १५९२ मध्ये एका नवोदित लेखकावर सडकून टीका केली.
त्याने लिहिलं –
“तो एक उगवता कावळा आहे, आमच्या पिसांनी सजलेला (आमच्या कल्पना चोरून लिहिणारा !)
आणि तो आमच्यासारखा काव्य लिहू शकतो असा त्याचा गैरसमज आहे”.
लेखक आणि राजकारणी असलेल्या सॅम्युएल पीप्स यालाही त्या लेखकाचं त्याने पाहिलेलं नाटक अजिबात आवडलं नाही.
१६६२ मध्ये त्याने लिहिलं –
“हे माझ्या आयुष्यात पाहिलेलं सगळ्यात कंटाळवाणं नाटक आहे.”
१७५८ मध्ये फ्रेंच कवी डिडरॉ त्या लेखकाबद्दल म्हणाला:
“त्याने काव्य लिहिले यात त्याची चूक नाही, पण त्यामुळे कवितेचा दर्जा खालावला.”
१७६५ मध्ये फ्रेंच इतिहासकार आणि प्रसिद्ध लेखक व्हॉल्टेअर म्हणाला:
“तो थोडीशी कल्पनाशक्ती असलेला “जंगली” लेखक होता. त्याची नाटकं फक्त लंडन आणि कॅनडातच चालतील.”
१८१४ मध्ये कवी बायरन म्हणाला:
“त्या लेखकाचं नाव उगाचच मोठं केलं गेलंय, लवकरच लोक त्याला विसरून जातील.”
१९०७ मध्ये जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणाला:
“त्याच्यासारखा लेखक मला इतका नकोसा वाटतो की त्याच्यावर दगड फेकावेत असं वाटतं.”
रशियन लेखक टॉलस्टॉय म्हणाला:
“त्याच्या नाटकांचा मला तीव्र तिरस्कार आहे आणि कंटाळा येतो.”
इतक्या मोठ्या कवी-लेखक -नाटककारांनी ज्या लेखकाची निंदा केली,
तो हयात असताना तर केलीच , त्याच्या मृत्यूपश्चातही केली,
जवळजवळ १५० वर्षे विविध महान लेखक – कवींनी ज्याच्यावर टीका केली,
आज तोच लेखक इंग्रजीतील सर्वात महान लेखक मानला जातो.
एव्हाना तुम्ही त्या लेखकाचं नाव ओळखलं असेलच !
तो लेखक आहे – विलियम शेक्सपिअर
असं का घडलं असेल ?
कोणाचं म्हणणं बरोबर आहे ? शेक्सपिअरची नाटके डोक्यावर घेणाऱ्या जगभरातील रसिकांचं की त्याच्यावर टीका करणाऱ्या हुशार, प्रभावी, प्रथितयश लेखकांचं ?
याच्यामागे एक तांत्रिक कारण आहे.
शेक्सपिअरच्या काळात जी नाटके होत तेव्हा ध्वनीक्षेपक नव्हते. कलाकारांना ओरडून बोलावे लागत होते. त्यात प्रेक्षकांचाही हल्लागुल्ला असायचा. हे वातावरण लक्षात घेऊन शेक्सपिअरने नाटके लिहिली.
त्याने सोपी भाषा, छोटी वाक्य आणि लोकाभिमुख शब्द आणि वाक्यप्रचार वापरले.
थोडक्यात, शेक्सपिअरने सामान्य पेक्षकांना समोर ठेवून नाटक लिहिलं.
शेक्सपिअरने कधीही टीकाकारांसाठी किंवा इतर लेखकांसाठी लिहिलं नाही. आणि त्याने टीका कधी ऐकलीही नाही.
त्याने सामान्य लोकांसाठी लिहिलं.
म्हणूनच आजही लोक त्याचे वाक्प्रचार दैनंदिन जीवनात वापरतात.
कधी तुम्ही एखादा सामान्य माणूस रॉबर्ट ग्रीन, व्हॉल्टेअर किंवा टॉलस्टॉय यांनी लिहिलेली वाक्य दैनंदिन वापरात ऐकली आहेत का?
पण शेक्सपिअर? रोज ऐकायला मिळतो.
हे अगदी तसेच आहे जे ज्ञानेश्वरांनी केले. सामान्य माणसांपर्यंत ज्ञान पोहोचविण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. म्हणून आज ज्ञानेश्वर अजरामर आहेत.
या उदाहरणांमधून दोन गोष्टी नक्की शिकण्यासारख्या आहेत.
१ . तुम्ही कोणीही असलात, काहीही केलं तरी टीका होणारच ! ज्यांचे ऐकले नाही ते पण टीका करणार, ज्यांचं ऐकलं ते पण टीका करणार आणि कोणाचंच ऐकली नाही तरी टीका होणारच !
त्यामुळे फार ताण घेऊ नका. मनातील “होकायंत्र” वापरा !
२ . आपल्या ग्राहकांना (Target Audience) समोर ठेवूनच सर्व कामे करा. त्यांना आवडेल का ? त्यांना उपयोगी ठरेल का ? त्यांना सोयीचे होईल का ? हा एकमेव विचार सदैव मनात राहूद्या.
नेटभेटचं काम “मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !” हे देखील अशाच प्रयत्नाचा भाग आहे. त्यावरही मराठी वाचकांचा आशीर्वाद असुद्या ही विनंती !
नेटभेटचे असेच उपयुक्त लेख, विडिओ आणि पॉडकास्ट मिळविण्यासाठी या 93217-13201 क्रमांकावर HI असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा !